पर्यटकांनी किनारे फुलले

परीक्षांचा हंगाम संपताच गर्दी

| अलिबाग | प्रतिनिधी |

परीक्षांचा हंगाम संपल्यानंतर रायगड जिल्ह्यात पर्यटकांची मोठी गर्दी उसळली असून, समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. मात्र, या वाढत्या गर्दीतच गॅस टंचाई आणि रस्त्यांच्या कामांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अलिबाग, किहीम, मुरूड, दिवेआगर या किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची सुरुवात होताच कुटुंबांसह आणि मित्रपरिवारासोबत पर्यटक येथे दाखल होत आहेत.परंतु, सध्या निर्माण झालेल्या गॅसटंचाईमुळे अनेक हॉटेल्स आणि खानावळींना स्वयंपाक करणे कठीण झाले आहे. परिणामी, काही ठिकाणी हॉटेल्स बंद ठेवावी लागत आहेत, तर काही ठिकाणी मर्यादित मेन्यूवरच सेवा दिली जात आहे. यामुळे पर्यटकांना जेवणासाठी प्रतीक्षा करावी लागत असून, गैरसोय वाढली आहे. याशिवाय, अलिबाग आणि मुरूड परिसरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी रस्ते अरुंद झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून पर्यटकांना तासन्‌‍‍तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागत आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाढून पर्यटकांचा त्रास अधिकच वाढला आहे.

हॉटेल व्यावसायिकांनी गॅस पुरवठा नियमित करण्याची मागणी केली असून, तर स्थानिक नागरिकांनी रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करण्याची गरज व्यक्त केली आहे. दरम्यान, प्रशासनाने या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, तसेच पर्यटकांनीही संयम बाळगून प्रवासाचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. एकीकडे निसर्गरम्य किनाऱ्यांचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी होत असली तरी मूलभूत सुविधांच्या कमतरतेमुळे पर्यटकांचा अनुभव काहीसा त्रासदायक ठरत असल्याचे चित्र सध्या रायगडमध्ये पाहायला मिळत आहे.

Exit mobile version