अनैतिक संबंधाचा रक्तरंजित शेवट!

मोहोपाड्यात 46 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून; पतीचा सहकारीच निघाला मारेकरी

| रसायनी | प्रतिनिधी |

प्रेमसंबंधातून सुरू झालेला वाद अखेर एका महिलेच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मोहोपाड्यात उघडकीस आली आहे. लग्नासाठी सतत आग्रह धरत असल्याच्या रागातून 29 वर्षीय तरुणाने 46 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरुवातीला आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे उलगडा झाला. रसायनी पोलिसांनी संजय रामनारायण कुशवाहा याला अटक केली असून, या घटनेने मोहोपाडा परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरतीदेवी देवेंद्र फाटक (46) या वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीजवळील साई दर्शन बिल्डिंगमधील रूम क्रमांक 103 मध्ये राहत होत्या. आरोपी संजय कुशवाहा (29, रा. परिश्रम बिल्डिंग, मरीआई मंदिराजवळ, मोहोपाडा) हा आरतीदेवी यांचे पती देवेंद्र फाटक यांच्यासोबत रिलायन्स कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होता. या ओळखीतून त्याचे फाटक कुटुंबीयांकडे येणे-जाणे होते.

दि. 30 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 7.32 ते 8.32 वाजण्याच्या दरम्यान आरोपीने महिलेच्या घराच्या परिसरात संशयास्पद हालचाली केल्याचे तपासात समोर आले. महिला कामावरून घरी परतत असताना आरोपीने तिचा पाठलाग केला आणि घरात घुसून अज्ञात कारणावरून तिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर रसायनी पोलीस ठाण्यात सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

मात्र, शवविच्छेदन अहवालात महिलेचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संजय कुशवाहा हा महिलेच्या घरात ये-जा करताना दिसून आला. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्याने हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे आणि मृत महिलेचे प्रेमसंबंध होते. महिला वारंवार लग्नासाठी आग्रह धरत होती; मात्र आरोपीचे आधीच लग्न झाले असल्याने त्याने लग्नास नकार दिला होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद होत होते. या वादातूनच महिलेचा गळा आवळून खून केल्याचे आरोपीने कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. खालापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ तपास करीत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बाचकर करीत आहेत.

Exit mobile version