कालव्यावरील साकव गेला वाहून

| खांब | वार्ताहर |

मागील आठवड्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रोहा तालुक्यातील देवकान्हे धानकान्हे हद्दीतील कालव्यावरील आदीवासी वाडीकडे जाणारा साकवच वाहून गेला आहे. येथील ग्रामस्थांच्या रहदारीच्या मार्गावरील हे साकव कोसळल्याने संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी आदिवासी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

रोहा तालुक्यातील कोलाड पाटबंधारेचा उजवा तीर कालव्याची दुरुस्ती गेली अनेक वर्षे सुरू आहे. त्यातच देवकान्हे धानकान्हे हद्दीत कालव्यावरील जीर्ण झालेले साकव काढून त्या ठिकाणी नवे साकव पाटबंधारे विभागाच्यावतीने बांधण्यात आले आहेत. मात्र, मागील तीन चार दिवसांपूर्वी मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे नव्याने बनविण्यात आलेला साकवच वाहून गेला आहे. त्यामुळे येथील आदिवासी नागरिकांचा मुख्य रहदारीचा मार्गक्रमण बंद झाल्याने त्यांच्यात संतापाची लाट उसळली आहे. सध्या पावसाळ्यात खरिपाच्या भात पिकांची लागवड सर्वत्र सुरू आहे. त्यामुळे येथील आदिवासी नागरिक हे मोलमजुरी करण्यासाठी या मार्गावरून ये-जा करत असतात. ऐन मोलमजुरी काळातच रहदारीचा मार्ग वाहून गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्याने याचे गांभीर्य लक्षात घेऊन याठीकाणी लवकरात लवकर उपाय योजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Exit mobile version