माणगावात बायपासचा प्रश्न सुटेना

| माणगाव | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव व इंदापूर येथील बायपास मार्गांचे काम अद्याप अपूर्ण असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. शनिवार-रविवारच्या सुट्ट्या, लग्नसराई तसेच विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पर्यटक, प्रवासी आणि नागरिकांची या मार्गावर मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने वाहतूक कोंडीचा फटका सर्वांनाच बसत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम काही ठिकाणी रखडलेले आहे, तर काही भागात पुलांच्या कामालाही विलंब होत आहे. त्यातच माणगाव व इंदापूर येथील बायपास मार्गांचे काम पूर्ण न झाल्यामुळे बाजारपेठेतूनच वाहने मार्गक्रमण करत असल्याने येथे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होत आहे. परिणामी, स्थानिक नागरिकांसह दूरवरून येणाऱ्या प्रवाशांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, रविवारी (दि.15) मार्च दुपारी माणगावहून महाड बाजूकडे जाणाऱ्या मार्गावर सुमारे दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाहतूक कोंडीमुळे पर्यटक, प्रवासी व स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. या पार्श्मभूमीवर खा. सुनील तटकरे यांनी नुकतेच माणगाव बायपासचे काम 31 मे 2026 पर्यंत पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. बायपास मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबईकर तसेच कोकणवासीयांना दीर्घकाळ भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येतून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून वेगाने काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत माणगाव बायपास पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होईल का, याकडे आता नागरिक आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version