मीनाक्षी पाटील यांचे वर्णन आजच्या भाषेत तेजतर्रार, तडफदार नेता असेच करावे लागेल. त्या जेव्हा 1995 मध्ये विधानसभेत आल्या, तेव्हा राजकारण्यांची एक नवी पिढी पुढे येत होती. त्यात मीनाक्षीताई, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि त्याही पेक्षा त्यांच्या समजदार आणि चतुर भाषणांमुळे लक्षात राहात होत्या. त्यांच्या मतदारसंघाशी, अलिबाग तालुक्याशी निगडित अनेक प्रश्नांचा ऊहापोह त्या विधानसभेत करतच असत; पण राज्यातील गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि पीडितांच्या प्रश्नांवरही त्यांचा आवाज उठत असे. सर्वसामान्यांच्या हितासाठी धडधडणारी तोफ आज थंडावली.
जेव्हा ताई विधानसभेत आल्या, तेव्हा राज्याच्या राजकारणात एक मोठे परिवर्तन घडले होते. त्यावर्षी भ्रष्टाचार आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण या दोन मुद्द्यांवर राज्यभरात रान उठवून शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीचे सरकार सत्तेत आले होते. शरद पवार हे राज्याच्या राजकारणात नंतरचे एखाद वर्षच होते. माजी मुख्यमंत्री व तत्कालीन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतापदावर शरदराव होते. त्यांचा विधानसभेत वावर नव्हता. पवारसाहेबांच्या बरोबरीने काम केलेले मीनाक्षीताईंचे काका दत्ता पाटील हे राजकीय क्षितिजावरून बाजूला झाले होते आणि त्यांच्या पक्षात- शेतकरी कामगार पक्षातही पुढची पिढी कार्यरत होताना दिसत होती.
या बदलत्या वातावरणात ताईंना आपला ठसा उमटवायचा होता. विरोधी पक्षात काम करणे हे काही शेतकरी कामगार पक्षाच्या लोकांना नवीन नव्हतेच. शेकाप दोन वेळाच आजवर सत्तेत सहभागी राहिला. जनता राजवटीतील शरद पवारांच्या ‘पुलोद’ प्रयोगात त्यांचा सत्तेत प्रत्यक्ष सहभाग होता. गणपतराव देशमुख, एन.डी. पाटील मंत्री झाले होते. 1999 च्या नंतरच्या दशकात विलासराव देशमुखांच्या पहिल्या शासनकाळात शेतकरी कामगार पक्षाने पुरोगामी लोकशाही आघाडीच्या शासनात सत्तेत थेट सहभाग घेतला होता. यावेळी गणपतरावांच्या बरोबरीने मीनाक्षीताई मंत्रीपदी दिसल्या. पण, तोही काळ अल्पच होता. हे एक-दोन प्रसंग वगळता ताईंनी नेहमीच विरोधी बाकावरूनच संघर्ष केला.
1995 ते 2014 असा पंधरा वर्षांचा कार्यकाळ त्यांना आमदार म्हणून मिळाला. त्या काळात अलिबाग तालुक्याच्या उत्थानाच्या अनेक योजना सरकारकडून मंजूर करून घेण्यात ताईंचा सहभाग होता. सिंहाचा वाटाही होता.
मीनाक्षीताईंचे विधानसभेतील भाषण म्हणजे ऐकणार्यांसाठी साहित्यिक मेजवानीच असे. ताईंना शेकडो कविता मुखोद्गत असत आणि त्यांचे संदर्भ त्या भाषणाच्या विषयाशी लीलया जोडून सहजतेने देत असत. त्यांच्या भाषणात एक लय असे. एक गोडवाही असे. त्यांचे भाषण संबंधित मंत्री तसेच सत्तारूढ पक्षावरचे आणि विरोधा बाकांवरचेही आमदार तल्लीनतेने ऐकत आहेत, असे दृश्य विधानसभेच्या पत्रकार गॅलरीतून अनेकदा पाहता आले.
कृषीवल दैनिकाचा मुंबई प्रतिनिधी म्हणून मी विजयराव मराठे संपादक होते तेव्हापासून काम पाहात होतो. सुरुवातीच्या काळात दत्ता पाटील हे आमदार या नात्याने आम्हाला विधानसभेत भेटत असत. बोलत असत. त्यांच्या नंतर मीनाक्षीताई आल्या. दोघांच्या व्यक्तिमत्त्वात फरक तर होताच. पण, वयातही व त्याहीपेक्षा पिढीचा मोठा फरक होता.
दत्ता पाटील हे जुन्या धाटणीचे नेते होते. त्यांना कोणी काय बातम्या देतोय, कृषीवलने माझे भाषण छापले आहे की नाही, याची चिंता नसायची. ताई या नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांना प्रसार माध्यमांचे महत्त्व जाणवत होते आणि आपले म्हणणे राज्याच्या सर्व विभागात कसे पोहोचले याची खात्री करावी, असे त्यांना वाटत असे. त्यांच्या बरोबरीचे तरूण आमदार आर.आर. पाटील, जयंत पाटील अशा सर्वांच्याच बाबतीत तेच म्हणता येईल. या तरूण आमदारांनी 1995 नंतरच्या काळात प्रसार माध्यमांचा वाढता प्रभाव ध्यानी घेऊन कामे केली.
ताई त्या काळात विधानभवनाच्या आवारात, सभागृहाबाहेरच्या पॅसेजमध्ये भेटत. त्यांचे पीए देशमुख हे पत्रकारांना शोधत. सर्व माहिती, भाषणातील मुद्दे पत्रकारांपर्यंत व्यवस्थित पोहोचले पाहिजेत, असा ताईंचा आग्रह असे. तेव्हा दूरदर्शनवर पाच मिनिटे व आकाशवाणीवर पंधरा मिनिटे सभागृहाच्या कामकाजाचे समालोचन प्रसारित होत असे. अनेकदा याची जबाबदारी आठवडाभर माझ्याकडे असे. अनेक आमदारांना तेव्हा आकाशवाणी व दूरदर्शनच्या वार्तापत्रात आपले विषय, आपले म्हणणे आले पाहिजे, असे प्रकर्षाने वाटत असे. कारण, तेव्हा हीच दोन प्रभावी प्रसार माध्यमे होती. नंतरच्या काळता विविध वृत्तवाहिन्यांचे पेव फुटले. समालोचन प्रसारणही थांबले. मात्र, आकाशवाणीवरून अजूनही विधानसभेत दिवसभर काय काय घडले, हे समालोचनाच्या माध्यमातून दिले जाते.
तो सुरवातीचा, पहिल्या आमदारकीचा काळ ताईंसाठी महत्त्वाचा होता व त्या दूरदर्शन आकाशवाणीबरोबरच छापील वृत्तपत्रांमध्ये काय येते याकडे लक्ष ठेवून असत. त्यांना मदत करण्यासाठी माझ्यासारखे त्यांचे अनेक पत्रकार मित्र पुढे असत, हे विशेष. कारण, ताईंच्या भाषणांतून, चर्चांमधून व त्यांनी विचारलेल्या प्रश्नांमधून चमकदार असे वृत्त सहज हाती येत असे.
मीनाक्षीताईंचा जेवणाचा डब्बा हे विधानभवनातील सर्वपक्षीय आमदारांसाठी व मंत्र्यांसाठी एक आकर्षणाचा विषय असे. त्यांच्याकडे सहजच पाच पंचवीस माणसे जेवतील असे डबे असत. माशांचे विविध प्रकार आणि त्यातही रायगडचा प्रसिद्ध जिताडा मासा खाण्यासाठी ताईंकडे आमदारांची, मंत्र्यांची व पत्रकारांचीही फेरी हमखास होत असे. त्यांची मॅजेस्टिक आमदार निवासातील 316 क्रमांकाची खोली ही तर ऐतिहासिक वास्तू ठरली पाहिजे! वारसा वास्तू म्हणून जतन केली पाहिजे. पण, आता ते शक्य नाही. कारण मॅजेस्टीक आमदार निवासाचे आता नव्याने बांधकाम केले जाणार आहे.
316 क्रमांकाची खोली हे शेतकरी कामगार पक्षाचे जवळपास मुख्यालय असे, अनेक दशके होते. कारण दत्ता पाटील तिथे राहात. त्यांच्यानंतर ताईंकडे तीच खोली आली होती. तिथूनच शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस झाल्यानंतर जयंत पाटील हे राजकारणाची सूत्रे हलवत असत. त्याच ऐतिहासिक खोलीत विलासराव देशमखांपासून छगन भुजबळांपर्यंतचे नेते फेर्या मारत होते व त्यानंतरच विलासरावांच्या नेतृत्वातील 1999 चे आघाडीचे सरकार साकारले होते. त्या सरकारच्या अवतारात 316 क्रमांची खोली व जयंत पाटील-मीनाक्षीताई या बहीण-भाऊ नेत्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. खरे तर, ताई व भाईंचे मित्र गोपीनाथ मुंडे हेही होते. जर नारायण राणेंच्याऐवजी मुंडेंच्या नेतृत्वात युतीचे सरकार आले असते, तर कदाचित शेतकरी कामगार पक्षाने, निदान बाहेरून तरी, मुंडेंच्या युती सरकारला पठिंबा दिला असता, इतके पाटील कुटुंबियांचे व मुंडेसाहेबांचे घनिष्ट स्नेहबंध होते. पण, तसे व्हायचे नव्हते. शिवसेना भाजपाच्या अंतर्गत वादात त्यांची युती मागे पडली व विलासराव-छगनरावांच्या आघाडीने पुढे चाल घेतली. ते सरकार स्थापन होत असताना शेतकरी कमगार पक्षाने रायगडच्या राजकारणातील मोठा तिढाही तेव्हा सोडवून घेतला होता व त्यासाठी ते सरकार काहीकाळ अडचणीतही आले होते. सुनील तटकरेंना तेव्हा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. इतका शेकापक्षाचा जोरदार प्रभाव त्या सरकारवर होता. विलासरावांच्या त्या सरकारमध्ये ताई बंदर विकास व मत्स्यव्यवसाय विकास हे महत्त्वाचे खाते सांभाळत होत्या. त्यांच्या मदारसंघासाठी तेच खाते महत्त्वाचे होते व त्यांनी ते मुद्दाम घेऊन कोकणपट्टीचे भले करण्याचा प्रयत्न केला होता. अशी विधानभवनातील बुलंद तोफ वयाच्या पंचाहत्तरीनंतर थंडावली. ताईंना विनम्र आदरांजली..! अनिकेत जोशी (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)