। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर तालुक्यातील एकमेव पुर्णत्वास गेलेले रानबाजिरे धरण गेल्यावर्षी 22 व 23 जुलै 2021 रोजी ओव्हरफ्लो होऊन धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागले होते. या पार्श्वभूमीवर हे धरण उशिराने भरावे, यासाठी गेल्या महिन्यापासून धरणातील पाणी उत्तर वाहिनी सावित्री नदीपात्रात सोडले जात आहे. यामुळे नदीपात्रात वाळू उपसा करणार्या काही गौणखनिज महसूल बुडवून समाजकार्य करणार्या व्यक्तींनी उपसा केलेली वाळू वाहून गेल्याने त्यांची वेळोवेळी धांदल उडाल्याचे दिसून आले आहे.
पोलादपूरनजिक रानबाजिरे येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या धरणामध्ये गेल्यावर्षी 22 जुलै 2021 रोजी चक्क 57.60 मीटर एवढी पाण्याची पातळी वाढून धोक्याच्या 58 मीटरच्या पातळीपर्यंत रातोरात पोहोचण्याची वेळ आली होती. पावसाळा सुरू झाल्यावर साधारणपणे ऑगस्ट महिन्यामध्ये धरणाची पाण्याची पातळी 57.40 मीटर पर्यंत पोहोचत असल्याच्या नोंदी गेल्या अनेक वर्षांपासून दिसून येत असताना गेल्यावर्षी 20 जुलै 2021 रोजीच धोक्याच्या पातळीपर्यंत पाण्याची पातळी पोहोचल्याने या परिस्थितीबाबत उपाययोजना शोधण्याची वेळ प्रशासनावर आली. या अनुषंगाने यंदा रानबाजिरे धरणातील बँक वॉटर मे महिन्यापासून सावित्री नदीपात्रातून सोडण्यास सुरूवात करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामागे जर धरणातील बॅकवॉटरची पातळी पाऊस सुरू होण्याआधीपासून खुपच खाली असेल तर बॅकवॉटर धोक्याच्या पातळीपर्यंत किंवा ओव्हरफ्लो होण्यास पूर्वीप्रमाणे ऑगस्ट महिन्यापर्यंतचा कालावधी लागून अतिवृष्टीकाळात धरणाची धोक्याची पातळी ओलांडली जाणार नाही, असा हेतू होता. यासाठी आपत्ती निवारण कक्ष आणि एमआयडीसीच्या धरणाचे अभियंते यांनी ही दक्षता घेतली होती.
जून 2022 या महिन्याच्या प्रारंभीच्या काळात रानबाजिरे धरणातून मोठया प्रमाणात बॅकवॉटरचा उपसा करण्यासाठी सांडव्याचे दरवाजे उघडून सावित्री नदीच्या प्रवाहातून पाणी सोडण्यात आले. याचदरम्यान, दिविल ते सवाद गावांतील सावित्री नदी पात्रादरम्यानच्या भागात वाळू, रेजगा तसेच दगड-गोटयांचा उपसा करणार्यांनी काढून ठेवलेली वाळू सर्वात आधी वाहून गेली तसेच दगड-गोटे-रेजगा उपसा करून झालेली समाजसेवाच फक्त शिल्लक राहिल्याने या धांदल उडालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी महाड एमआयडीसीच्या अभियंत्यांच्या नावाने शंख करण्यास सुरूवात केली. मात्र, आता रानबाजिरे येथील धरणाचे बॅकवॉटरचे क्षेत्र जवळपास 75 टक्के रिकामे झाले असल्याने यंदा बॅकवॉटर क्षेत्र भरण्यास गेल्यावर्षीपेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, मे महिन्यापासून बॅकवॉटरक्षेत्र रिकामे करण्याच्या सातत्यामुळे पोलादपूर ते महाड औद्योगिक क्षेत्रातील नदीपात्रामध्ये पुरेसे पाणी राहिल्याने या दरम्यानच्या पात्रालगतच्या गावांमध्ये सर्वसामान्यांना गुरांना पाणी व कपडे व भांडी तसेच अन्य कामासाठी पाण्याची टंचाई जाणवली नाही.