कंट्राटदाराने निकृष्ट दर्जोच काम केल्याचा ग्रामस्थांचा आरोप
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील वावे-बेलोशी मार्गावरील खड्डेमय रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठ दिवसांपासून काम सुरु केले आहे. परंतु, अवघ्या दोन दिवसांतच रस्ता खराब झाल्याचे चित्र दिसून आले आहे. त्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप अनेकांकडून केला जात आहे. रस्त्यावरील खडी बाहेर निघाल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हा रस्ता अपघाताला कारणीभूत ठरण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही वर्षापासून वावे-बेलोशी रस्त्यावर लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. शासनाच्या अर्थसंकल्पातून दोन वेळा निधी मंजूर केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपलब्ध झाली आहे. परंतु, या रस्त्याची अवस्था दयनीय होत चालली आहे. वावे-बेलोशी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासी, वाहन चालक त्रस्त झाले आहेत. विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत या रस्त्याच्या कामासाठी दुतर्फा खडी टाकून ठेवण्यात आली होती. निवडणूक होऊन अनेक दिवस उलटूनही रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली नाही. रस्त्याच्या बाजूला टाकलेल्या खडीचा वाहन चालकांना प्रचंड त्रास झाला होता. रस्त्याच्या कामाला कधी सुरुवात होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर या रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळाला असून मागील आठ दिवसांपासून टप्प्या टप्प्याने रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी खडी टाकून डांबर पसरवून त्यावर रोलर फिरवून रस्ता तयार करण्याचे काम केले आहे.
परंतु, वावे येथील एका खासगी शाळेपासून शंभर मीटर अंतरावर अनेक ठिकाणी खडी बाहेर निघाली आहे. वाहन चालविताना तारेवरची कसरत करण्याची वेळ चालकांवर आली आहे. 15 टनाहून अधिक वजनाचे वाहन गेल्याने हा प्रकार घडल्याचे तेथील एका कामगाराने सांगितले. परंतु, अनेकांकडून या कामाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित काम हे निकृष्ट दर्जाचे असून खडी टाकताना डांबरचा वापर कमी केल्याचा आरोप अनेकांनी केली आहे. रस्त्यावर खडी असल्याने अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बैठकीला असल्याचे सांगून या विषयावर बोलणे टाळले आहे. दरम्यान, प्रवाशांसह चालकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या वावे-बेलोशी रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास डोंगरे यांना वेळ नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.