| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी संजय रॉय याला सोमवारी (दि.20) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्याला शनिवारी (दि.18) दोषी ठरवले होते. त्याला सोमवारी सियालदह न्यायालयाचे न्यायाधीश अनिर्बान दास यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याला न्यायालयाने 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने संजय रॉय याला फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. तसेच पीडितेच्या पालकांच्या वकिलांनीदेखील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांनी दोषीला फाशीची शिक्षा सुनावण्यास नकार देत हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ म्हणून वर्गीकृत केला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. यावेळी न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला पीडितेच्या कुटुंबाला 17 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले. न्यायालयाने शिक्षा सुनावण्यापूर्वी दोषी रॉयने आपण निर्दोष असल्याचा पुन्हा एकदा दावा केला. मी काहीही केलेले नाही. बलात्कार अथवा खूनही केलेला नाही. मला या गुन्ह्यात विनाकारण अडकवण्यात आले आहे. मी निष्पाप आहे. मी तुम्हाला आधीच सांगितले होते की माझा छळ करण्यात आला. त्यांना जे हवे होते त्यासाठी मला स्वाक्षरी करायला लावली, असे रॉयने न्यायालयात सांगितले.