रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे अपघाताची भीती
धुळीमुळे पादचाऱ्यांसह प्रवाशांचे आरोग्य धोक्यात
| अलिबाग | प्रतिनिधी |
तालुक्यातील बोरघर फाटा ते रामराज रस्त्यावर खडीचा पसारा झाला आहे. त्यावरून दुचाकी वाहने चालविणे म्हणजे तारेवरची कसरत बनली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. धुळीमुळे पादचाऱ्यांसह प्रवाशांचे आरोग्यदेखील धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
बोरघर फाटा ते रामराज रस्ता रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतो. रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळ्यानंतर खड्ड्यांची तात्पुरत्या स्वरुपात डागडुजी करण्यात आली. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावरील दगड खडीचा पसारा वाढला आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, दगड खडीमुळे वाहन चालविताना अपघात होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दोन किलोमीटरच्या अंतरावर पसरलेल्या खडीमुळे नाका तोंडात धूळ जात आहे. त्यामुळे प्रवाशांसह पादचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्याचे काम काही महिन्यापुर्वी करण्यात आले. मात्र त्याचा दर्जा निकृष्ट असल्याने फटका प्रवाशांना बसत आहे. रामराज ही मोठी बाजारपेठ आहे. शनिवारी या ठिकाणी आठवडा बाजार भरतो. त्यामुळे वाहनांसह नागरिकांची हजारोच्या संख्येने या ठिकाणी गर्दी होते. मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभाग या समस्यांकडे लक्ष देत नसल्याची तक्रार आहे.
अपूर्ण कामाचा प्रवाशांना फटका सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठा गाजावाजा करीत गुढीपाड्याचा मुहूर्त गाठत अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याचे काम सुरु केले. बेलकडे ते वेलवली खानावपर्यंत डांबरीकरणाचे काम केले. त्यानंतर वेलवली खानाव ते एचपी कंपनीसमोरील प्रवेशद्वारापर्यंत काँक्रीटीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी केले. परंतू एका बाजूचे काँक्रीटीकरण झाले. काम अपुर्ण केल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. रात्री बेरात्री या रस्त्यावर वाहन चालवितानान अपघात होण्याची भिती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुखदेवे यांना विचारणा केली असता, पावसाळ्यामुळे काम थांबविले होते. आता लवकरच रस्त्याचे काम नव्याने सुरु होईल असे सांगितले.







