| नवी मुबंई । प्रतिनिधी ।
नवी मुंबई महापालिकेत ज्येष्ठ नागरीकांचा आधार ठरणारी अनेक ज्येष्ठ नागरीक विरंगुळा केंद्र तयार करण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरीकांना आधार देणारे व त्यांची सुश्रुषा करणारे सामाजिक व खासगी संस्थांचे हजारो वृध्दाश्रम देशभरात आहेत. परंतू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून देशात व राज्यात प्रथमच नवी मुंबई महापालिका वृद्धाश्रम तयार करणारे पहिले शहर ठरले असून सीवू्डस येथील वृध्दाश्रमाचे काम अंतिम टप्प्यात आहे. वर्षाच्या अखेरीस हे काम पूर्णत्वास येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नव्या वर्षात याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार असल्याचे चित्र आहे.
पालिकेच्या मागणीनुसार सिडकोकडून पालिकेला भूखंड हस्तातंरीत झाल्यानंतर पालिकेकडून वृध्दाश्रमाच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. परंतु करोनास्थितीमुळे या कामाला थोडा विलंब लागला. परंतु आता काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे पालिकेचा पहिला वृध्दाश्रम 2022 अखेरीस पूर्ण होऊन नव्या वर्षात याची सुरवात होईल.
सद्याच्या धावपळीच्या जीवनात वृद्धांची सुश्रुषा करणार्यांचे प्रमाण चांगले असून आपल्या ज्येष्ठांच्याबाबात आदर व आपुलकीने सेवा करणार्यांच्या बरोबरच दुसरीकडे आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांना गैरसोयीमुळे तसेच कौटुंबिक अडचणींमुळे वृद्धाश्रमात ठेवण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळते. दुसरीकडे वृद्धांच्याकडून इच्छा मरणाच्या मागणीमध्ये वाढ होत असताना दिसते. तर विभक्त कुटुंब पद्धतीमुळे बदलणारा काळ यामुळे वृध्दाश्रमाची आवश्यकता निर्माण झाली आहे. नवी मुंबई महापालिकेने शहरात ज्येष्ठांना आधार व विरंगुळा देणारी अनेक ज्येष्ठ नागरीक विरंगुळा केंद्र निर्माण केली आहेत.
शहरातील पालिकेचा वृध्दाश्रम
ठिकाण- नेरुळ सेक्टर- 38, भूखंड क्रमांक- 13
प्रस्तावित खर्च – 4 कोटी 10 लाख 59 हजार
एकूण बांधकाम – 9763 चौरस फुट