पारंपारिक कलाकुसर जपण्याचा प्रयत्न; नवदुर्गा म्हणून होणार सन्मान
। कर्जत । संतोष पेरणे ।
महाराष्ट्रात अनेक संस्कृती असून, त्या जोपासण्यची गरज आहे. मुळच्या कोकणातील असलेल्या उल्का देवरुखकर यांनी महाराष्ट्रातील हस्तकला जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी लोप पावत चाललेल्या संस्कृतीला, हस्तकला व्यवसायाला ‘कारागिरी’ या संस्थेच्या माध्यमातून ब्रँड म्हणून पुढे आणण्याचे कार्य केले आहे. तसेच, अनेक वर्षे ही कला जोपासणार्या उल्का यांना यावर्षीचा नवदुर्गा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने हस्तकला आणि उल्का देवरुखकर असे समीकरण बनलेल्या कारागिराला उत्तम व्यासपीठ मिळताना दिसत आहे.
हस्तकला हे आदिवासी कारागिरांसाठी आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. पारंपारिक कलाकुसरीची निर्मिती आणि विक्री करून आदिवासी समुदायातील व्यक्ती चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवू शकतात आणि त्यांचे आर्थिक कल्याणही सुधारू शकते. स्थानिक बाजारपेठेची स्थापना करणे, हस्तकला वस्तूंना प्रोत्साहन देणे, आदिवासी क्षेत्राच्या सर्वांगीण आर्थिक विकासास हातभार लावणे, सांस्कृतिक वारसा जपणे अशा पद्धतीने आदिवासी कारागीर त्यांची सांस्कृतिक ठेवा किंवा वारसा जपण्यासाठी योगदान देऊ शकतात. त्यामुळे आपला सांस्कृतिक ठेवा आणि पारंपरिक कला जोपासण्याच्या निमित्ताने हस्तकला टिकवण्यासाठीचे प्रयन्त उल्का देवरुखकर यांच्या माध्यमातून सुरु आहे. तसेच, हस्तकला क्षेत्रात आपल्या जादुई कलाच्या माध्यमातून समाजाला पुन्हा एकदा हस्तकलेची भुरळ पाडण्यात यशस्वी ठरलेल्या उल्का देवरुखकर यांना दैवज्ञ समाजोन्नती परिषद यांच्याकडून नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
कला जिवंत ठेवण्याचे कार्य
पारंपारिक ज्ञान, कौशल्य आणि कथा या एका पिढीकडून दुसर्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम या हस्तकला करत असतात. हस्तकलांचा एक विशेष गुणधर्म आहे. त्या अशाच पर्यटकांना आकर्षित करत असतात. त्यामुळे अशा वस्तूंची मागणी स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकते. हस्तकलांची निर्मितीमध्ये हस्तकला निर्माण करणारे कारागीर नैसर्गिक साधनांच्या वापराला जास्त प्रोत्साहन देत असतात. पारंपरिक हस्तकलेवर केंद्रित करणार्या प्रशिक्षण कार्यशाळा यांच्या माध्यमातून हि कला जिवंत ठेवण्याचे कार्य ‘कारागिरी’ या संस्थेच्या माध्यमातून उल्का देवरुखकर करीत आहेत.
पर्यावरण वाचविण्यास हातभार
हस्तकला या बर्याच कारणांमुळे पर्यावरणास अनुकूल मानल्या जातात आणि त्यांची उत्पादन वापर पर्यावरण वाचवण्यास हातभार लावू शकतात. या कलेसाठी टिकाऊ साहित्यांचा, कमी ऊर्जेचा व स्थानिक उत्पादनाचा जास्तीतजास्त वापर, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर, कारागिरांच्या कौशल्याचा वापर, कमीतकमी रासायनिक घटक, निसर्गाशी संबंधित असलेल्या साहित्याचा वापर केला जातो. हस्तकला हा कलेचा एक पारंपरिक प्रकार असल्यामुळे तेथील स्थानिक रहिवाशांना सहजपणे शिकवल्या जाऊ शकते. त्यामुळे उत्पादनाची संख्याही वाढू शकते.