। महाड । प्रतिनिधी ।
रायगड विभागातील नांदगाव बुद्रुक येथे राहणार्या तृप्ती अनिल वाडकर यांना मागील आठवड्यात पोटात अचानक दुखू लागले. त्यामुळे त्यांनी स्थानिक आशा सेविकेंच्या मदतीने पाचाड आरोग्य केंद्रांतील सिस्टर सना मुजावर यांच्याशी संपर्क साधून तातडीने बोलावून घेतले. यावेळी संबंधित महिलेची तपासणी केली जात असतानाच पोटदुखीचा त्रास वाढू लागला. त्यामुळे महिलेला तातडीने रुग्णवाहिकेतून पाचाड आरोग्य केंद्रात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तळोशी गावाजवळ जाईपर्यंत त्रास वाढू लागल्याने संबंधित सिस्टर सना मुजावर यांनी डॉ.सृष्टी शेळके यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून महिला रुग्णांची हकिकत कथन केली. त्यानंतर परिसरात असलेल्या डॉक्टरांनी तातडीने रुग्णवाहिकेतच त्या महिलेची स्थिती लक्षात घेऊन पुरेसे साहित्य उपलब्ध नसतानाही आणीबाणीच्या परिस्थितीत प्रसूतीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली.
यानंतर संबंधित महिला व तिच्या बाळाला पाचाड आरोग्य केंद्रात दाखल केले असून दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याची माहिती पाचाड आरोग्य केंद्रातून देण्यात आली आहे. शासनाच्या ग्रामीण भागातील महिलांच्या गरोदरपणासाठी असलेल्या विविध योजना तसेच रूग्णवाहिकेची तातडीने झालेली उपलब्धता व आरोग्य कर्मचार्यांनी दाखवलेली तत्परता, डॉक्टरांनी गंभीरता ओळखून केलेल्या कामाचे रायगड विभागासह तालुक्यातील शासकीय यंत्रणांकडून कौतुक होत आहे.
संबंधित महिला व बाळाबाबत केलेल्या कार्यवाहीबद्दल आरोग्य विभागाच्या संबंधित डॉ. सृष्टी शेळके, सिस्टर सना मुजावर, चालक अनंत अवकिरकर, साक्षी लांमजे, अंकिता गायकवाड, आशा सेविका निशा कळंबे, अंगणवाडी मदतनीस चंद्रकला वांगणी, दिगंबर खैरकर या सर्वांचे विभागातून अभिनंदन करण्यात येत आहे.