| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
पाली-खोपोली राज्य महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वीच या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले होते. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या काही वर्षांतच रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सध्या या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून, हेदवली येथे तर रस्त्याच्या कडेला मोठा आणि धोकादायक खड्डा पडला आहे, ज्यामुळे येथे कधीही मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
रात्रीच्या वेळी किंवा पावसाच्या दिवसात हा खड्डा वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास भीषण अपघात घडू शकतो. या महामार्गावर काही ठिकाणी काँक्रीटच्या रस्त्याला डांबरीकरण करण्यात आले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य वाढत चालले असून, अपघातांची मालिका देखील सुरूच आहे. फक्त हेदवलीच नव्हे, तर उंबरे गावाच्या अलीकडे, मिरकुटवाडी, गोंदाव फाटा, परळी, जांभूळपाडा, वऱ्हाड, रासळ आणि वझरोली अशा अनेक ठिकाणी रस्त्यावरती मोठे खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्याच्या मधोमध काँक्रीट जाऊन त्या ठिकाणी रुंद भेगा पडल्या आहेत. यामुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.
एमएसआरडीसीने या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन, केवळ वरवरची डागडुजी न करता हेदवलीसह इतर सर्व ठिकाणचे खड्डे दर्जेदार पद्धतीने बुजवावेत, जेणेकरून वाहनचालकांचा प्रवास सुरक्षित होईल. पाली- खोपोली राज्य महामार्ग दुरवस्थे संदर्भात एमएसआरडीसी कार्यकारी अभियंता सारंग इनामदार यांच्यासोबत बोलणे झाले असता त्यांनी सांगितले की या राज्य महामार्गाची देखभाल दुरुस्ती लवकरच करण्यात येईल.
पाली-खोपोली महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम होऊन काहीच वर्षे झाली आहेत. रस्ता एवढ्या लवकर खराब होणे हे कामाच्या अत्यंत निकृष्ट दर्जाचे लक्षण आहे. प्रशासनाने संबंधित ठेकेदाराने तात्काळ दखल घेऊन रस्त्याची योग्य ती डागडुजी करावी.
सुनील साठे,
अध्यक्ष, मनसे, सुधागड तालुका
