एक खासदार, दोन मंत्री; तरीही कामे ठप्पच!
| माणगाव | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर म्हणून ओळख असलेल्या माणगावच्या विकासाला गेल्या काही वर्षांत अक्षरशः ब्रेक लागला आहे. कोट्यवधी रुपयांच्या योजना मंजूर असूनही त्या कागदावरच अडकल्या आहेत. शहराचा विकास आराखडा, सांडपाणी योजना, ट्रॉमा हॉस्पिटल, नाट्यगृह, विद्युत उपकेंद्र, शिवसृष्टीसह अनेक प्रकल्प रखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे, एक खासदार आणि राज्यातील दोन मंत्री प्रतिनिधित्व करत असतानाही माणगावला अपेक्षित विकास का मिळत नाही? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी आवश्यक असलेला विकास आराखडा, नगररचना योजना, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प आणि भुयारी गटार योजना अद्याप मंत्रालयाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे शिवसृष्टी, नाना-नानी पार्क, सार्वजनिक प्रसाधनगृहे यांसाठी निधी मंजूर असूनही स्थानिक मतभेदांमुळे कामांना सुरुवातच झालेली नाही. परिणामी, निधी असूनही विकासकामे कागदावरच अडकून पडली आहेत.
लाखो रुपये खर्चून उभारलेली विद्युत शवदाहिनी बंद अवस्थेत आहे, तर नाट्यगृहाचे काम निधीअभावी अर्धवट पडले आहे. शहरासाठी अत्यावश्यक असलेले ट्रॉमा केअर हॉस्पिटल अद्याप सुरू झालेले नाही. मोठ्या अपेक्षेने उभारलेले क्रीडा संकुल देखभालीअभावी निष्क्रिय झाले असून, प्रस्तावित कोकण विभागीय क्रीडा संकुल माणगावऐवजी खारघरला गेल्याने युवकांमध्ये नाराजी आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी, अतिक्रमणे, रखडलेला बायपास, उघडी व तुंबलेली गटारे, दुर्गंधी, बंद डंपिंग ग्राउंड आणि अस्वच्छता या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. मच्छी, भाजी आणि फळ बाजाराची सुविधा नसल्याने विक्रेत्यांना उघड्यावर व्यवसाय करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि रुग्णालये त्रस्त आहेत. अनेक वर्षांपासून स्वतंत्र विद्युत उपकेंद्राची मागणी होत असली तरी त्याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
नगरपंचायत निवडणूक तोंडावर आली असताना पुन्हा विकासाच्या घोषणा सुरू झाल्या आहेत. मात्र, आश्वासनांचा पाऊस आणि प्रत्यक्ष कामांचा दुष्काळ यामुळे नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. उद्योग, शिक्षण, आरोग्य, वाहतूक आणि पर्यटनाच्या दृष्टीने मोठी क्षमता असलेल्या माणगावला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रखडलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
