सरपंचांकडून रास्ता रोकोचा इशारा
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील अटल सेतू-चिरनेर या कोकणाकडे जोडणाऱ्या महत्त्वाच्या दिघोडे-चिर्ले या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करोडो रुपयांचा निधी उपलब्ध होऊनही मागील पाच महिन्यांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. तरी या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी काम सुरू न केल्यास जनहितार्थ रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांनी दिला आहे.
दिघोडे-वेश्वी- चिर्ले या गावांतून जाणारा हा महत्त्वाचा रस्ता पुढे अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीए बंदर तसेच चिरनेर मार्ग, पुणे कोकणातील राज्यमार्गाला जोडला जातो. 2022-23 मध्ये आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम आणि सततच्या अवजड वाहनांच्या रेलचेलीमुळे हा रस्ता अल्पावधीतच खराब झाला होता. खेडोपाडी काँक्रीटचे रस्ते होत असताना तालुक्याला जोडणारा हा मुख्य रस्ता मात्र दयनीय अवस्थेत असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण करण्यात यावे यासाठी दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खड्ड्यात बसून उग्र स्वरूपाचे आंदोलन केले होते.
या आंदोलनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेऊन उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली दिघोडे-चिर्ले रस्त्याच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरणासाठी 2025-26 मध्ये सुमारे 45 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, असे असतानाही या रस्त्याचे काम रखडल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर पावसाळ्यात वाहनांना अपघात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.तरी या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू करण्यात यावे यासाठी दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांनी उरण तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग उरण, पोलीस यंत्रणा तसेच संबंधित खात्याकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच, काम सुरू न केल्यास जनहितार्थ रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.







