मुक्या जनावरांची पाण्यासाठी धाव

| उरण | प्रतिनिधी |

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रचंड उष्णतेचा फटका केवळ माणसांनाच नव्हे तर मुक्या जनावरांनाही बसताना दिसत आहे. वाढत्या तापमानामुळे परिसरातील पाण्याचे स्रोत आटत चालल्याने मुक्या जनावरांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी या जनावरांना अक्षरशः वणवण भटकण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी पाणी मिळत नसल्याने ही जनावरे ओढे, हौद किंवा पाण्याच्या जागांकडे येत असून कोणीतरी पाणी पाजेल या आशेने तिथेच थांबत असल्याचे चित्र दिसत आहे. गुरुवारी द्रोणागिरी गडावरील हौदाजवळ अशीच हृदयस्पर्शी घटना घडली. दोन मुक्या जनावरांनी तहानेने व्याकुळ होऊन हौदाजवळ धाव घेतली. त्यांना हौदातून पाणी काढून देण्यात आल्यानंतर त्यांनी पाणी पिऊन आपली तहान भागवली. तहान भागल्यानंतर त्या मुक्या जनावरांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधानाचे हावभाव पाहून उपस्थितांनाही मन विषण्ण झाले. वाढत्या उष्णतेमुळे मुक्या प्राण्यांची होणारी ही परवड पाहता नागरिकांनी शक्य त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करून मानवतेचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Exit mobile version