। मध्य प्रदेश । वृत्तसंस्था ।
भारताला नेहमीच चित्ता आपल्या जंगलात परत हवा होता. इराणने भारताची विनंती धुडकावून लावल्याने एशियाटिक चित्ता पुन्हा आणण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. अत्तापर्यंत इराणकडे फक्त २० आशियाई चित्ते शिल्लक आहेत. त्यानंतर भारतीय सरकार आफ्रिकेकडे वळले. ज्यांच्याकडे सध्या जवळपास ७,००० चित्ते शिल्लक आहेत. १२ वर्षांहून अधिक वाटाघाटीनंतर, नामिबिया आणि भारताच्या सरकारांनी अखेर या वर्षी एक करार केला. आणि काल (दि.१७) या आठ चित्त्यांना विशेष आफ्रिकन विमानांनी भारतात आणलं आहे.
पृथ्वीवरील सर्वात वेगवान प्राणी जो काही सेकंदात ताशी १२० किमीचा वेग पकडू शकतो पण, तो गोळ्यांच्या वेगाला मागे टाकू शकला नाही. आणि १९४७ मध्ये, कोरावीच्या महाराजांनी केलेल्या गोळ्यांनी शेवटच्या तीन चित्त्यांचं मृत्यू झाला असे मानले जाते. १९५२ मध्ये, चित्ता अखेर भारतातून नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले.
भारतातून नामशेष झालेले चित्ते जवळपास ७० वर्षांनी पुन्हा भारतात दाखल. नामबियासोबत झालेल्या करारामुळे नामिबियामधून आठ चित्ते भारतात दाखल झाले आहेत. यासाठी मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्क ची निवड करण्यात आली आहे.
कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. चित्त्यांना एक महिना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. कुनो नॅशनल पार्क हे ७४८ चौरस किलोमीटरवर पसरलेले संरक्षित क्षेत्र आहे. या पार्कमध्ये चित्त्यांसाठी १२ किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे. चित्त्यांना सुरुवातीला या अधिवासात ठेवण्यात येणार आहे.