जिल्हा प्रशासनाकडून आदेश
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात उन्हाळी सुट्टीत फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची वाढती संख्या पाहता, त्यांची गैरसोय टाळण्यासाठी, पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव दि. 17 व 18 मे आणि दि. 24 ते 25 रोजी सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत अलिबाग-धरमतर, अलिबाग-मांडवा जेट्टी, अलिबाग-मुरुड या मार्गांवर चार दिवस अवजड वाहनांना नो एन्ट्री असणार आहे. या मार्गावर होणारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याठिकाणी जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक वगळता तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
रायगड जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याकारणाने आणि मे महिन्यात मुलांना शाळेला सुट्टी असल्याने पर्यटक हे मांडवा, किहीम अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशिद, मुरूड, दिवेआगर, श्रीवर्धन, महाड अशा पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणात आपापली वाहने घेऊन येत असतात. सध्या मे महिन्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुट्टी असल्याकारणाने पर्यटक हे रायगड जिल्ह्यामध्ये फिरण्याकरिता वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यावरील बीचला भेटी देत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असून त्यातच महामार्गावरील जड-अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. वडखळ-अलिबाग हा रस्ता एकेरी रस्ता आहे. तसेच अलिबाग-रेवस व अलिबाग-रेवदंडा-मुरूड हे रस्ते अरूंद आहेत. पर्यटकांची प्रचंड प्रमाणात येणारी व जाणारी वाहने व त्याच वेळी रोडवरून होणारी डंपर, ट्रक व इतर जड-अवजड वाहनांची वाहतूक कोंडी होण्याची तसेच अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
पोलीस अधीक्षक, रायगड-अलिबाग यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, या मार्गांवरून मांडवा जलवाहतूक सेवा, पर्यटकांची वाहने तसेच डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर सारखी अवजड वाहने एकाच वेळी ये-जा करत असल्याने वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विशेषतः शनिवार-रविवारच्या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढते. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक व पर्यटक यांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये याकरिता, दि. 17 व 18 मे आणि दि. 24 व 25 मे या दोन आठवड्यांत सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत या मार्गांवर जड व अवजड वाहनांची वाहतूक बंदी घालण्यात आली आहे.
या वाहनांना सूट
ही वाहतूक बंदी फक्त जीवनावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांकरिता लागू राहणार नाही. त्यामध्ये दूध, डिझेल, गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला वाहतूक करणारी वाहने, पोलीस, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी असलेली वाहने यांचा समावेश आहे.
कोणत्या मार्गावर बंदी?
दि. 17 व 18 मे तसेच दि. 24 व 25 मे रोजी सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166-अ वर धरमतर पूल ते अलिबाग तसेच अलिबाग ते मांडवा जेट्टी व अलिबाग-रेवदंडा-मुरूड या राज्यमार्गावरील जीवनावश्यक वस्तू वगळून जड-अवजड वाहनांची वाहतूक बंदी करण्यात आली आहे.