। चिरनेर । प्रतिनिधी ।
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर उरण रेल्वे सेवा सुरू झाली. त्यामुळे उरणकरांचा प्रवास अतिजलद झाला आहे. सुरुवातीस चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, लोकल फेर्यांची संख्या सध्या कमी असल्याने प्रवाशांची मोठी परवड होत आहे. त्यामुळे लोकलच्या फेर्या निदान सकाळी व संध्याकाळी तरी वाढवून मिळाव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्या जैसे थेच आहे. अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकार्यांनी दिली. त्यासाठी थेट केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आश्वासन दिले होते.
मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनीही अशाच प्रकारचे आश्वासन दिले होते. त्यामुळे उरण ते नेरूळ बेलापूर या मार्गावरील लोकल अर्ध्या तासाच्या अंतराने सुरू होण्याची आशा निर्माण झाली होती. लोकलच्या फेर्यांमध्ये वाढ न झाल्याने उरण शहरातून नव्याने सुरू झालेल्या एनएमएमटी बस सेवेकडे प्रवासी वाढू लागले आहेत. उरण ते नेरूळ तसेच उरण ते बेलापूर लोकल रेल्वे 12 जानेवारी 2024 मध्ये उरणकरांच्या मागणी नुसार सुरू झाली. उरण नेरूळ उरण बेलापूर लोकल ट्रेन सुरू झाल्याने उरणकरांचा पनवेल नवीमुंबई ते मुंबई प्रवास जलद झाला. उरणचा औद्योगिक विकास झाल्याने नोकर्यांची संख्या वाढली आहे. परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्येवर त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. मागील काही काळात मुंबई, नवी मुंबई, पनवेल येथून उरणमध्ये येणार्या चाकरमान्यांची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
उरणमधील कित्येक विद्यार्थी शिक्षणासाठी मुंबई, नवी मुंबईत ये-जा करत असतात. खाजगी रिक्षा 6 मीटर व टेम्पो टॅक्सचा वेळ खाऊ खर्चिक प्रवास करण्यापेक्षा कमी वेळेत व कमी खर्चात उरणमधील प्रवासी लोकलने प्रवास करत आहेत. उरण शहराव्यतिरिक्त केगाव, नागाव, बोकडविरा चाणजे, मुळेखंड, बालई, पाणजे, करंजा त्याचबरोबर उरण पश्चिम विभाग व पूर्व विभागातील गावे, टाऊनशिप, द्रोणागिरी नोड अशा कित्येक भागातील नागरिकमोठ्या प्रमाणात लोकलने प्रवास करू लागले आहेत.
लोकलच्या फेर्यांमध्ये वाढ करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. मात्र, रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने, नवी मुंबई महापालिकेचे परिवहन उपक्रम एनएमएमटी बसकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. प्रवाशांना विविध सवलती देत एनएमएमटीने प्रवासी संख्या वाढवण्यावर भर दिला आहे.