कुर्डुसमध्ये बिनदिक्कतपणे होतेय अवैध उत्खनन
| कोर्लई | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कुर्डुस येथील कामत वाडीतील खासग खंड 186 क्षेत्र 4543 चौ.मी. या शेतजमिनीत कमळाकर नाम्या गडखळ व बुधाबाई कमळाकर गडखळ या दळी जमिनीवर धनदांडगे जेसीबीच्या सहाय्याने अवैध उत्खनन करुन नासधूस करीत असून, याप्रकरणी सखोल चौकशी करून आदिवासी बांधवांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत आदिवासी सामाजिक संस्थेतर्फे अध्यक्ष जानू शिद, कायदेशीर सल्लागार अॅड.डॉ. के.डी.पाटील, अॅड.जयेंद्र गुंजाळ अॅड. विक्रांत पाटील, मार्गदर्शक डॉ.संदीप वारगे यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी अ.प्र. दिवेकर यांनी निवेदन स्वीकारले.
या निवेदनात म्हटले आहे की, कामतवाडी कुर्डुस, ता. अलिबाग येथे वनखंड 186 क्षेत्र 4543 चौ.मी. या वर्णनाची कमळाकर नाम्य गडखळ व सुभानाई कमळाकर गडखळ यांच्या नावे व मालकी ताबे हक्कात असलेली दळी जमीन आहे. या जमिनीवरती गडखळ कुटुंबीय उदरनिर्वाह करीत आहेत. या जमिनीवरील कुटुंबाचे पालनपोषणासाठी अत्यंत आवश्यक आहे. वनजमिनी अनुसूचित जमाती व अदिवासी समाजाला सरकारने दिलेली महत्वाचा अधिकार व आधार आहे.
असे असताना सदर दळी भागावर जेसीबीच्या सहय्याने काही लोक जमिनीची नासधूस करत आहेत व मालकांना न जुमानता उत्खनन करत आहेत. सदर कुटुंबाच्या चरित्रासाठी सदर जमीन मिळकत अतिशय महत्त्वाची आहे. सबब मानवाधिकाराचा विचार करुन सदर बाबींची सखोल चौकशी करण्यात यावी व गडखळ कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक, तहसीलदार, वीज अभियंता- महावितरण अलिबाग यांना देण्यात आल्या आहेत.
यावेळी आदिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जानू शिद, कायदेशीर सल्लागार अॅड.डॉ.के.डी.पाटील, मार्गदर्शक डॉ. संदीप वारगे, अॅड. विक्रांत पाटील, अॅड. जयेंद्र गुंजाळ, गणेश कातकरी, सल्लागार संतोष चिंचकर, अॅड. नरेश पाटील, बुधाबाई गडखळ, दिनकर गडखळ, गजानन गडखळ, गंगाराम गडखळ, रोहिदास गडखळ यांसह आदिवासी बांधव व महिला संख्येने यावेळी उपस्थिती होत्या.