फार्महाऊस मालकाची मुजोरी

शेताकडे जाण्याचा मार्ग केला बंद; महसूल विभागाच्या आदेशाला केराची टोपली

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील सोलन पाडा धरणाकडे जाणारा रस्ता येथील एका फार्महाऊस मालकाने बंद केला आहे. ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी हा रस्ता खुला केला होता. मात्र, त्या फार्महाऊस मालकीनीने जाणाऱ्या त्या रस्त्यावर असलेले गेटला टाळे ठोकले आहे. दरम्यान, पाणंद रस्ता प्रशासनाने खुला करावा आणि शेतकऱ्यांना जंगलात तसेच शेतीकडे जाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी केली आहे.

कर्जत तालुक्यातील सोलनपाडा पाझर तलाव येथील मनमोहक दृश्यामुळे पावसाळी पर्यटन या भागात खुलते. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात फार्महाऊस उभे राहिले असून, येथील एका फार्महाऊस मालकाने पाझर तलावाच्या बाजूने शेतीकडे आणि जंगलाकडे जाणारा रस्ता अडवला होता. त्यावर मौजे सोलनपाडा येथील धरणाकडे जाणारा एकमेव पानंद रस्ता एका फार्महाऊस मालकाकडून बंद करण्यात आला. आपल्या मालकीच्या जागेतून कोणालाही जाता येणार नाही अशी त्यांची भूमिका होती. मात्र, तेथील शेतकरी आणि जंगलात रानमेव काढण्यासाठी जाणारे लोक यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात येताच माजी उपसरपंच भगवान पिंपरकर तसेच योगेश कोकणे यांनी तातडीने याबद्दल पाठपुरावा सुरू केला.

या तक्रारीची दखल घेऊन महसूल विभागाने हालचाली करीत मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना घटनास्थळी पाठवले. महसूल अधिकारी कर्मचारी यांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी पाणंद रस्ता खुला करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपल्याला गेट बंद करून घेतल्याने होणारा त्रास याबद्दल महसूल कर्मचाऱ्यांना माहिती दिली. यावेळी निलेश पिंपरकर, विलास सावंत, कांतिलाल कोकणे, मारुती कोकणे, विजय बिबवे, बबन सावंत, अशोक थरकुडे, नितेश कडलक, उमेश घुडे, आदित्य शेट्टी आदी उपस्थित होते.

स्थानिक कार्यकर्ते यांच्याकडून झालेला पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे सोलनपाडा ग्रामस्थ यांचा शेतीकडे जाणारा मार्ग खुला झाला. मात्र, हा आनंद काही दिवसच टिकला असून त्या फार्महाऊस मालकाने महसूल विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा पाणंद रस्ता खुला केला होता. मात्र, आठ दिवसात त्या फार्महाऊस मालकाने त्या ठिकाणी असलेले लोखंडी गेट याला टाळे ठोकले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांची सुरू असलेली लगबग थांबली आहे. शेतकऱ्यांना सध्या पाझर तलावातून वाट काढत आपल्या शेतीकडे आणि जंगलात जावे लागत आहे.

ग्रामस्थ हतबल
पावसाळ्यात पाझर तलाव काठोकाठ भरतो आणि त्यावेळी शेतकऱ्यांना शेतीकडे जाणे बंद होऊ शकते. फार्महाऊस मालकाची एवढी मुजोरी वाढली असल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत. महसूल विभागाने खुला करून दिलेला रस्ता पुन्हा बंद करण्याची हिंमत फार्महाऊस मालक दाखवत असल्याने खळबळ माजली आहे.
Exit mobile version