समृद्धीचा अखेरचा टप्पा खुला होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

। ठाणे । प्रतिनिधी ।

दळणवळणासाठी अतिशय महत्वाचा ठरलेला समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा टप्पा 1 मे रोजी सुरु होण्याची शक्यता आहे. या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा राज्य सरकारचा मानस असून त्या दृष्टीने सरकारी पातळीवर हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.

समृद्धी महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 दरम्यान हाती घेतलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. या महामार्गाचे काम 2019 मध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र, कोरोनामुळे समृद्धी महामार्गाच्या कामाला काही काळ विलंब झाला. कोरोनानंतर मात्र या कामाला गती मिळाली. डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर मे 2023 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी ते भारविर (नाशिक) टप्पा सुरू केला. त्याचवर्षी भारविर ते इगतपुरी (25 किमी) हा टप्पाही खुला करण्यात आला होता.

एमएसआरडीसीने 55 हजार कोटी खर्च करून 701 किमीचा 24 जिल्ह्यांना जोडणारा हा समृद्धी महामार्ग तयार केला आहे. त्यामुळे राज्याची दळणवळण व्यवस्थाही गतिमान झाली आहे. आतापर्यंत टप्याटप्प्याने या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले आहे. आता इगतपुरी ते आमने (ठाणे) हा शेवटचा टप्पा येत्या 1 मे रोजी खुला होण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फायदा हा नाशिकला होणार असून नाशिक ते मुंबई हे अंतर अवघ्या अडीज तासांत गाठता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये होणार्‍या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट समिटला उपस्थित राहणार असल्यामुळे, त्यांच्या हस्ते 1 मे रोजी या प्रकल्पांचे लोकार्पण करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. हा महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर आणि ठाणे या 10 जिल्ह्यांमधून जाणार आहे. महामार्गावर सुमारे 50 उड्डाणपूल, पाच बोगदे, 300 वाहनांसाठी अंडरपास आणि 400 पादचारी अंडरपास असतील.

Exit mobile version