सांगलीत रंगणार पहिली स्पर्धा


महिलांसाठी आता महाराष्ट्र केसरी
| पुणे | प्रतिनिधी |
पुरुषांप्रमाणेच आता महिलांसाठीही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, महिलांची ही पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगलीत 23 आणि 24 मार्च रोजी रंगणार आहे. राज्य कुस्तीगिर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी ही घोषणा केली.

कोट
महिलांच्या कुस्तीला चालना मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्र केसरी किताबाची स्पर्धा घेतली जाणार आहे. विजेतीला चांदीची गदा दिली जाणार आहे. या स्पर्धेत 34 जिल्हे आणि 11 महानगरपालिका असे एकूण 45 संघ सहभागी होणार आहेत. सांगली तालीम संघाला महिलांच्या या पहिल्या महाराष्ट्र केसरीचे यजमानपद मिळाले आहे. ही स्पर्धा मॅटवर होणार आहे.
बाळासाहेब लांडगे,सरचिटणीस

स्पर्धा महाराष्ट्र केसरी गटासह 50, 53, 55, 57, 59, 62, 65, 68, 72 आणि 76 अशा विविध वजनीगटात होणार आहे. याशिवाय इचलकरंजीला कुमार गटाची राज्य अजिंक्यपद स्पर्धा होईल, त्यानंतर पुण्यात वरिष्ठ गटाची राज्य ग्रिकोरोमन कुस्ती स्पर्धा 27 आणि 28 मार्च रोजी होईल, अशी माहिती लांडगे यांनी दिली.
महाराष्ट्र केसरी या स्पर्धेला मोठी पंरपरा आहे. पण यापूर्वी ही स्पर्धा फक्त पुरुषांपुरतीच मर्यादीत होती. पण आता खेळ बदलला आहे. पूर्वी फक्त मातीत कुस्ती खेळली जायची, आता ती मॅचवर आली आहे. पूर्वी कुस्ती फक्त पुरुष खेळायचे, पण आता माहिलाही यामध्ये पुढे आल्या आहेत. भारतीय महिलांनी कुस्तीमध्ये देदिप्यमान कामगिरी केली आहे. आता महिला कुस्तीमध्येही भारताने बरीच पदकं पटकावली आहेत. त्यामुळे महिलांची ङ्गमहाराष्ट्र केसरीफ स्पर्धा खेळवणं हे राज्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट असणार आहे. कारण या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटू पुढे येतील आणि त्यांना एक चांगले व्यासपीठ मिळेल. त्याचबरोबर महिला कुस्तीपटूंची ओळखही महाराष्ट्रातील जनतेला होण्यास मदत मिळेल. महाराष्ट्राकडून जास्त महिला कुस्तीपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्याचे पाहायला मिळाले नाही. पण त्यासाठी ही स्पर्धा महत्वाची ठरू शकते. कारण या स्पर्धेमधून जी गुणवत्ता पुढे येईल ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यास मदत होईल.

Exit mobile version