सायकलमुळे शिक्षणाचा मार्ग मोकळा

मुलींच्या चेहऱ्यावर फुलला आनंद
सायकल वाटप कार्यक्रमासह रो-रो बोटीत बसण्याचा लुटला मुलींनी आनंद

| अलिबाग | प्रतिनिधी

घरापासून शाळेचे अंतर तीन ते पाच किलोमीटर आहे. कधी चालत, तर कधी अन्य वाहनांचा आधार घेत शाळेत जावे लागते. परंतु, शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने, सीएफटीआय (सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) व एम 2 एम. यांच्यामार्फत आम्हाला सायकल वाटप झाल्या आहेत. त्याचा खूप आनंद झाला. या सायकलमुळे शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी प्रतिक्रिया देत सायकल मिळाल्याचा आनंद मुलींनी मनमुरादपणे लुटला.


शाळेत जाण्यासाठी सुविधांचा अभाव असल्याने ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका कायमच राहिला आहे. गावातील मुली शिकल्या पाहिजेत, शाळेतील मुलींची गळती कमी झाली पाहिजे ही भूमिका घेत सरकारच्या एक पाऊल पुढे जात शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने सीएफटीआय या संस्थेच्या माध्यमातून 81 मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या. धोकवडे व परहूरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील मुलींना या सायकलचा आधार मिळाला. हा आगळावेगळा कार्यक्रम रो रो बोटीतून घेतल्याने या कार्यक्रमाबरोबरच बोटीत बसल्याचा आनंद मुलींनी लुटला.


यावेळी शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, एम 2 एम बोट फेरीचे संचालक असिम मोंगिया, भारती मोंगिया, देविका सायगल, धेोकवडे सरपंच जयश्री म्हात्रे, उपसरपंच सचिन म्हात्रे, गुरुप्रसाद म्हात्रे, सासवणेच्या नैना शिलधणकर, अश्विनी भगत, समीर भगत, मज्जीद कुर, अशोक म्हात्रे, विनोद खोपकर आदी मान्यवरांसह विद्यार्थिनी, त्यांचे पालक, शेकाप कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम रो-रो बोटीमध्ये घेण्यात आला. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलींना या बोटीत बसण्याचा आनंदही घेता आला. त्यामुळे मुलींच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून आला.


मुलींची शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे- चित्रलेखा पाटील
प्रभाकर पाटील, दत्ता पाटील यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचे दारे खुली आहेत. तोच वारसा आमदार जयंत पाटील यांनी सांभाळत शिक्षणाची भूमिका महत्त्वाची ठेवली आहे. गावे, वाड्यांमध्ये राहणाऱ्या मुलींना शाळेत जाण्यासाठी सुविधा नसल्याने अनेक वेळा शिक्षणापासून दूर राहण्याची वेळ येते. याबाबत शोध घेत, संशोधन करीत आमच्या टीमने गरजू मुलींचा शोध घेतला. त्यात कार्यकर्त्यानीदेखील प्रचंड मेहनत घेतली.


महाराष्ट्राला, विशेष करून रायगड जिल्ह्याला शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. तोच विचार घेत मुलींसाठी सायकल वाटप करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत हजारो मुलींना सायकल देण्यात आल्या आहेत. एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. वेगवेगळ्या संस्था उभारून लोकांच्या हितासाठी पाटील कुटुंबियांनी काम केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गरजूंना चष्मे वाटप करणे, मुलींना सायकल देणे, अशा अनेक प्रकारचे वेगवेगळे उपक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. मुलींची शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे, हा उद्देश समोर ठेवून सायकल वाटप केल्या आहेत, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

मी जांभुळपाडामध्ये राहते. हाशिवरे येथील शाळेत शिक्षण घेते. घरापासून शाळेचे अंतर सुमारे पाच किलोमीटरपेक्षा जास्त आहे. कधी चालत, तर कधी अन्य वाहनांचा आधार घेत शाळेत जाते. चित्रलेखा पाटील यांच्यामुळे मला सायकल मिळाल्याने खूप आनंद झाला आहे.

पायल प्रभाकर धसाडे, जांभुळपाडा

मी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आज सायकल मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. सायकलमुळे मला शाळेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

श्रावणी राकेश थळे, झालखंड

मी इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. शाळेपासून घर तीन किलोमीटर अंतरावर असून, मला पायी चालत जावे लागते. परंतु, चित्रलेखा पाटील यांच्यामुळे सायकल मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. आता सायकलवर शाळेत जाता येणार आहे.

समर्था राकेश तुपे, झालखंड

घरापासून शाळा जवळपास चार किलोमीटर लांब आहे. गावापासून मुख्य रस्त्यावर येणे, त्यानंतर बस अथवा अन्य वाहनाने शाळेत जावे लागते. शेकापच्या चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने सायकल मिळाली. त्यामुळे शाळेत जाण्याची दगदग कमी होऊन वेळही वाचणार आहे.

अंतरा अमोल कवळे, परहूर

चित्रलेखा पाटील तळागाळापर्यंत जाऊन काम करतात. वंचित घटकाच्या उन्नतीसाठी त्या कायमच काम करीत आहेत. महिला सक्षमीकरण, आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी चित्रलेखा पाटील प्रचंड मेहनत घेत आहे. त्यांच्या माध्यमातून सीएफटीआय या संस्थेद्वारे मुलींना सायकल वाटप करून मदतीचा हात देण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जात आहे.

भारती मोंगिया, संचालक, एम 2 एम फेरी बोट सर्व्हिस
Exit mobile version