स्थानकांच्या दुरवस्थेला वाली कोण?
| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा बसस्थानकांची राज्य परिवहन महामंडळ ठाणे विभागातून आलेल्या बसस्थानक मुल्यांकन समितीकडून पहाणी करण्यात आली. मात्र स्थानकांच्या दुरावस्थेला वाली कोण? हा सवाल प्रवासीवर्ग करत आहे.
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सन 2025 अंतर्गत मुल्यांकन समितीने नुकतीच रेवदंडा बसस्थानकांस भेट देवून पाहाणी केली. यावेळी मूल्याकंन समितीचे ठाणे विभागीय वाहतूक अधिकारी रमेश बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा बसस्थानकांची पहाणी करण्यात आली. यावेळी त्याचे समवेत ठाणे विभाग कर्मचारी कृष्णा बन यांच्यासह रेवदंडा बसस्थानक वाहतूक नियत्रंक देवराज राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी बसस्थानकासंदर्भात विविध समस्या व सुविधा बाबत पहाणी करण्यात आली व त्यांचे गुणलेखन उपस्थित प्रवासीवर्गाकडून घेण्यात आले.
अलिबाग, रोहा, व मुरूड तालुक्याला मध्यवर्ती असलेले, मुंबई, पुणे, ठाणे आदी महाराष्ट्रातील सर्वच शहरांशी येथील प्रवासीवर्ग निगडीत असल्याने रेवदंडा बसस्थानक राज्य परिवहन मंडळासाठी फार महत्वाचे ठरत आहे. मात्र रेवदंडा बसस्थानक समस्येच्या फेऱ्यात अडकला आहे, विशेष करून रेवदंडा बसस्थानकाच्या आवारात दुरवस्था निर्माण झाली असून बसस्थानक आवारात खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसाळयात मोठी तळी निर्माण होतात, अनेकदा तक्रार करून सुध्दा बसस्थानक आवाराचे नूतनीकरण केले जात नाही, तसेच बसस्थानक परिसरात अवैध पार्किंग केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक नित्याने करत आहेत. रेवदंडा बसस्थानकांच्या दुरवस्थेला वाली कोण? असा सवाल प्रवासीवर्ग करत आहे.