सरकारकडे 12 कोटी निधीची मागणी; प्रस्ताव सहा महिन्यांपासून लालफितीत अडकून
| रायगड | प्रतिनिधी |
बदलापूर येथील दुर्घटनेनंतर शिक्षण विभागाने राज्यातील सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सरकारकडे 12 कोटी निधीची मागणी केली होती. मात्र, हा प्रस्ताव सहा महिन्यांपासून लालफितीत अडकून असल्याची माहिती समोर येत आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या तीन हजार 585 शाळा आहेत. त्यात अडीच हजार शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. एक लाखांहून अधिक विद्यार्थी शाळांमध्ये शिक्षण घेतात. बदलापूरसारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला. शिक्षण विभागाकडे पुरेसा निधी नसल्याने त्यांनी सरकारकडे निधीची मागणी केली. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव दिला होता. जिल्ह्यात एकूण तीन हजार 583 शाळा, शिक्षण संस्था आहेत. यापैकी फक्त 728 शाळा, शिक्षण संस्थांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. उर्वरित दोन हजार 855 शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले नाहीत. त्यामध्ये दोन हजार 476 जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची माहिती उघड झाली आहे. सरकारकडून निधी न मिळाल्याने जिल्हा परिषदेच्या दोन हजार 476 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नाहीत. सहा महिन्यांपासून शिक्षण विभाग निधीच्या प्रतीक्षेत असून, सरकारी दिरंगाईचा फटका शाळेतील सुरक्षा व्यवस्थेला बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी शिक्षण विभागाकडे पुरेसा निधी नाही. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी केली आहे. अंदाजे 12 कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. निधी प्राप्त झाल्यावर तातडीने सीसीटीव्ही लावण्यात येतील, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी सांगितले.