| रायगड | प्रतिनिधी |
मुसळधार पावसात नद्यांवरील कमकुवत पूल कोसळण्याच्या घटना रायगड जिल्ह्यात दरवर्षी घडतात. अशा कमकुवत पुलांची जिल्हा प्रशासनाकडून तपासणी करण्यात येत असून, पावसाळ्यापूर्वी त्यांची डागडुजी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, सर्व पुलांची पाहणी करण्यात आली असून, बांधकाम विभाग कामाला लागला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेत 40 जणांना जीव गमवावा लागला होता. त्याचबरोबर मुरूड तालुक्यातील काशीद, चिकणी, विहूर येथील सावक, रोहा तालुक्यातील शेणवई येथील सावक कोसळले आहेत. अतिवृष्टीत अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पावसाळापूर्व तयारीत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पुलांच्या दुरुस्तीच्या सूचना केल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील बांधकाम विभागासह जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या पुलांची पावसाळ्यापूर्वी तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामीण भागाचा विकास हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केला जातो. गावे, वाड्यांसह मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या साकवांची देखभाल-दुरुस्ती आणि नवीन साकव बांधणीचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत केले जाते. जिल्ह्यात गाव-वाड्यांना जोडणाऱ्या साकवांची संख्या 80 हून अधिक आहे. तसेच शासनाच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीत सुमारे 70 हून अधिक पूल आहेत.महामार्गासह जिल्हा रस्त्याला जोडणाऱ्या पुलांची दुरुस्ती बांधकाम विभागाकडून केली जाते.
जिल्ह्यातील अनेक पूल 30 वर्षांपेक्षा जुने आहेत. देखभाल-दुरुस्ती वेळेत न झाल्यास अतिवृष्टीमुळे पूल कोसळण्याचा धोका अधिक असतो. काही ब्रिटिशकालीनही पूल अद्याप वापरात आहेत. नागोठणे येथील पूल तर 350 वर्षांपूर्वीचा आहे. रेवदंडा, आंबेत या पुलांवरील वाहतूक डागडुजी होईपर्यंत नेहमीच थांबवावी लागते. पावसाळ्यात वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असल्याने पुलांची निगा राखणेही गरजेचे आहे. जे पूल पावसाळ्यात वाहतुकीस योग्य नसतील त्या पुलांवरून तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक बंद ठेवण्याचेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून दिले जातात. यासाठी जिल्ह्यातील पुलांची पाहणी करण्यात येत आहे. त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल देवांग यांनी दिली.
अपघात टाळण्यासाठी डागडुजी
महाड येथील सावित्री पुलाची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत धोकादायक पुलांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती तात्काळ करावी व पर्यायी मार्ग सुस्थितीत ठेवावेत. तसेच रस्त्यावरील खड्डे, साईडपट्टी भरून घेणे, रस्त्यावरील ब्लिंकर्स, दुभाजक दर्शविणारे फलक, अपघातग्रस्त ठिकाणे असलेले माहिती फलक, रिफ्लेक्टर्स बसवावेत, अशा सूचना बांधकाम विभागाला करण्यात आल्या आहेत. त्यानुसार वेगवेगळ्या पुलांची पाहणी करून आराखडा तयार केला जात आहे.
जिल्ह्यातील मार्गांची लांबी
राष्ट्रीय महामार्ग - 219.48 किमी
द्रुतगती मार्ग - 41.20 किमी
प्रमुख राज्य महामार्ग - 245.56 किमी
राज्य महामार्ग - 706.18 किमी
प्रमुख जिल्हा रस्ते - 1,283.96 किमी
इतर जिल्हा रस्ते - 1,924.34 किमी
ग्रामीण रस्ते - 4,303.34 किमी
जिल्ह्यातील पुलांची पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. यातील कमकुवत पुलांची तात्काळ डागडुजी केली जात आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे लागणार आहे. जे पूल वाहतुकीसाठी धोकादायक असतील तिथे सूचना फलक किंवा गरज भासल्यास त्या पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळवण्यात येणार येईल.
जे. ई. सुखदेवे,
कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, अलिबाग.