। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील मिळकखार येथील वासवानी कंपनीच्या कांदळवन, सीआरझेड व ना विकास क्षेत्रामध्ये केलेला बेकायदेशीर भरावप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत.धनदांडग्यांनी आता चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाचीही फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गौणखनिजांवरील रॉयल्टी भरण्याचे बनावट पावती बुक छापून महसूल विभागाला करोडोंचा चुना लावण्याचे काम मिळकतखार येथील भराव करणार्या लॉबीकडून सुरू आहे. भराव करणारे कंत्राटदार बनावट रॉयल्टी पावत्यांचा वापर करून भराव करत आहेत. हा प्रकार कृषीवलने उघडकीस आणला असून, आता प्रशासन फसवणूक करणार्यांवर काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सरकारचा महसूल विभाग या गौणखनिजांवर रॉयल्टी आकारात असतो. मात्र, रॉयल्टी भरण्यापोटी बनावट पावती पुस्तके छापून सरकारी यंत्रणेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात येत असल्याचा प्रकार मिळकतखार भराव प्रकरणात समोर आला आहे. नकली रॉयल्टी पावतीवरील असलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यावर कोणताही ओटीपी येत नाही. मात्र, खर्या रॉयल्टी पावतीवरील स्कॅन केल्यावर ओटीपी नंबर जनरेट होतो, हे माहीत असतानाही जिल्हा प्रशासनाने त्याची शहानिशा न करता वैकुंठ रवींद्र पाटील यांच्या नावाचा वापर करुन बनविलेल्या बोगस पावत्यांकडे दुर्लक्ष केले. मात्र, कृषीवलच्या टीमने पुरावे तपासून वस्तुस्थिती तपासली असता वैकुंठ पाटील यांच्या नावाने वापरलेल्या रॉयल्टीच्या पावत्या बोगस असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मंडळ अधिकार्यांचा अहवाल
मंडळ अधिकारी सारळ यांनी 16 जानेवारी 2025 रोजी अलिबाग तहसीलदारांकडे सादर केलेल्या अहवालामध्ये मिळकतखार येथील गट नं. 47/2, 49,50,51 या मिळकती वरुण गोविंद वासवाणी व इतर यांच्या नावे दाखल आहे. त्या मिळकतीमध्ये जमीन मालकाने माती/मुरूम टाकून भराव केल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी बनविलेल्या रस्त्याच्या भरावावर माती/मुरूम टाकण्याचे काम चालू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच गट नं. 47/2, 49, 50, 51 मध्ये एकूण 154.47 ब्रास माती/मुरूम भराव माती/मुरूमाचा भराव केल्याचे नमूद केले आहे. त्यावेळी ट्रक एमएच 06 एक्यू 1591 हा ट्रक माती/मुरूम खाली करुन रिकामा असलेला जागेवर आढळून आला. त्यावेळी ट्रक चालकास रॉयल्टी वाहतूक परवाना विचारले असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांच्याकडील पेणमधील वैकुंठ रवींद्र पाटील यांच्या नावाची पावती पुस्तक क्र. 1605 अ.क्र. 89146, 89417, 89418 हा गौण खनिज वाहतूक परवाना सादर केला. त्याला भरावाबावत विचारणा केली असता भरावाबाबत कोणतीही सक्षम प्राधिकारणाची परवानगी असल्याचे त्याने कागदपत्र सादर केले नाही.
कारवाईचे नाटक बंद करा
मिळकतखारमध्ये गेले कित्येक महिने अनधिकृत भराव केला जात आहे. यातील डंपर गौणखनिजची रॉयल्टी बुडवून, बनावट पावतीवर माल घेऊन जात असल्याने करोडो रूपयांचा महसूल बुडाला आहे. मात्र, यावर विशेष लक्ष न देता तोंडदेखली कारवाई करण्याचे नाटक महसूल विभाग करीत आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत महसूल बुडविणार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वैकुंठ पाटील यांच्या नावाचा गैरवापर
पेण येथील वैकुंठ पाटील यांचा क्रशरचा व्यवसाय असून, त्यांनी नियमांत राहून शासनाची रॉयल्टी भरली आहे. सरकारने त्यांना केवळ दगड उत्खननासाठी परवानगी दिली आहे. मिळकतखार येथील ट्रक चालकाने मातीच्या भरावाबाबत दाखविलेल्या रॉयल्टीच्या पावत्या पूर्णपणे खोट्या असून, त्या पावत्यांवर ईटीपी नंबरदेखील नमूद नाही. मिळकतखार येथील भरवाबाबत वैकुंठ पाटील यांचा कोणताही संबंध नाही. याप्रकरणी पावत्यांचा गैरवापर करण्यात आला असून, प्रशासनाने चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वैकुंठ पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
रॉयल्टी भरुन दगड उत्खननाचे काम केले जाते. पावत्यांवर ईटीपी नंबर असणे अनिवार्य आहे. मिळकतखार प्रकरणातील पावत्या खोट्या आहेत. पावत्यांसोबत छेडछाड करण्यात आली आहे. याबाबत संबंधित विभागाकडे अर्ज देण्यात आला असून, खोट्या पावत्या बनविणार्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वैकुंठ पाटील,
पेण