पालकमंत्रीपदावरुन जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले
| रायगड | आविष्कार देसाई |
जिल्ह्यातील पालकमंत्रीपदावरुन शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून विस्तवही जात नाही. शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंसह जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार सात्यत्याने दबाव टाकत आहेत. त्यांना शांत करण्यासाठी महायुतीच्या भात्यातून ईडीअस्त्राने असंतुष्टांची शिकार तर होणार नाही ना, अशी भीती रायगडच्या राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपाचे प्रत्येकी तीन आमदार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आदिती तटकरे या एकमेव आमदार आहेत. असे असतानाही पालकमंत्रीपदाची माळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिती तटकरे यांच्या गळ्यात घातली होती. सुनील तटकरे यांच्या राजकीय खेळीने शिंदे गट चारीमुंड्या चित झाला, अशी चर्चा जिल्ह्यात रंगली. त्यामुळे त्यांनी याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत प्रखर विरोध केला. त्यानंतर 48 तासांतच रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर आली.
या राजकीय घडामोडीमुळे आपला तात्पुरता विजय झाल्याने शिंदे गटातील आमदारांना विशेष करुन भरत गोगावले यांना हायसे वाटत असावे. तसेच आपल्या मुलीचे पालकमंत्रीपद काढून अपमानास्पद वागणूक मिळाल्याची खंत बेसुमार राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या खासदार तटकरेंना झाली नसेल तर नवलच.
सध्या खासदार तटकरे यांचे दिल्ली दरबारी वजन वाढल्याची जोरदार चर्चा आहे. मोदी सरकारने त्यांना पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस समितीचे अध्यक्ष बनवले आहे. मध्यंतरी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे एक विशेष बैठक पार पडली होती. त्या बैठकीला केंद्रीय सचिव दर्जाच्या अधिकार्यांची चांगलीच धावपळ झाली होती. तटकरे यांचा मोदी-शाहा यांच्याबरोबर गेल्या काही वर्षात दांडगा संपर्क झाला आहे.
रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरुन शिंदे गटाची सुरु असलेली टिवटिव कशी बंद करायची हे मुरब्बी राजकारणी म्हणून खासदार तटकरे यांना माहिती असणारच. पालकमंत्रीपद गेले असतानाही 26 जानेवारीला सरकारी ध्वजारोहण हे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याच हस्ते होणार आहे. तशी रितसर सरकारी निमंत्रण पत्रिका जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढली आहे.
डोईजड होणार्यांचा आवाज कसा बंद करायचा हे आपण गेल्या काही वर्षांपासून पाहात आहोत. त्यामध्ये ईडी, सीबीआय, आयकर विभाग, एसीबी अशा स्वायत्त संस्थांचा कसा वापर झाला, हे उघड आहे. मंत्री भरत गोगावले यांना शांत करण्यासाठी अशा काही विचित्र राजकीय हालचाली होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.