प्रशासकीय भवनाजवळच स्टॅम्प व्हेंडरचे स्टॉल्स
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत येथील तहसील कार्यालय आणि प्रांताधिकारी कार्यालय हे मे अखेरीस नवीन प्रशासकीय भवन येथे आले. मात्र, त्यानंतरदेखील तीन महिने कर्जत तालुक्यातील जनतेला शासकीय कामासाठी लागणारे मुद्रांक पेपर खरेदी करण्यासाठी जुने तहसील कार्यालय असलेल्या टेकडीवर जावे लागत होते. त्याबद्दल सर्व माध्यमांनी आवाज उठवल्यावर आता प्रशासकीय भवनाजवळ स्टॅम्प व्हेंडर यांचे स्टॉल्स सुरू झाले आहेत. दरम्यान, प्रशासकीय भवनासमोरील शासकीय जागेत स्टॅम्प व्हेंडर स्टॉल्स बांधण्यात आले आहेत.
कर्जत शहरात नवीन प्रशासकीय भवन उभे राहिले असून, या कार्यालयाशी संबंधित असलेले मुद्रांक पेपर विकत घेण्यासाठी कर्जत तालुक्यातील जनतेला जुन्या तहसील कार्यालयात जावे लागत होते. मे 2024 अखेरीस कर्जत प्रशासकीय भवनमधून प्रांत अधिकारी आणि तहसील कार्यालय सुरू झाली. जुन्या तहसील कार्यालयाच्या रेकॉर्ड रूमसमोर मुद्रांक विक्रेते यांचे स्टॉल्स आहेत. मात्र, नवीन प्रशासकीय भवनमध्ये मुद्रांक विक्रेत्यांना जागा देण्यात आली नव्हती. त्यामुळे शालेय कामासाठी आवश्यक असलेले दाखले मिळविण्यासाठी कर्जत तालुक्यातील जनतेची पुरती दमछाक झाली होती. तीन महिने शालेय विद्यार्थी, त्यांचे पालक हे जुनी कचेरी नवीन प्रशासकीय भवन अशा येरझर्या मारत होते. मात्र, प्रशासकीय भवनमध्ये किंवा समोर काही जागा उपलब्ध करून दिली जात नव्हती. मुद्रांक विक्रेते यांनी जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्याशी संपर्क साधून कर्जत प्रशासकीय भवनमध्ये जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
त्यानंतर कर्जत तालुक्यातील प्रसार माध्यमांनी प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणाबद्दल जोरदार आवाज उठवला. स्थानिकांचे जुने कार्यालय आणि नवीन कार्यालय गाठताना होणारी दमछाक यांची वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि प्रशासकीय भवनाच्या बाजूला असलेली तलाठी कार्यालयाच्या बाजूची मोकळी जागा मुद्रांक विक्रेते यांना देण्यात आली. त्या ठिकाणी नोंदणीकृत असलेल्या पाच मुद्रांक विक्रेते यांनी आपल्यासाठी निवारा बांधला. शासनाने त्यासाठी कोणतेही आर्थिक मदत केलेली नसून पूर्ण तयार झालेल्या मुद्रांक विक्रेते कार्यालयाचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अधिकृत मुद्रांक विक्रेते रघुनाथ मोरे, संजय गायकवाड यांनी आमदार थोरवे यांचे स्वागत केले.