खड्डेमय रस्त्याची डोकेदुखी दूर होणार

दीड महिन्यात 500 मीटर काम पूर्ण

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या नेरळ कशेळे रस्त्यावरील खड्ड्यांची कटकट आता संपणार आहे. नेरळ साई मंदिर नाक्यापासून पुढे जिते वाडीपर्यंत हा रस्ता पावसाळयात पाण्याखाली जातो. उन्हाळ्यात अर्ध्या रस्त्यावर आजूबाजूच्या इमारतीमधील पाणी वाहून येऊन रस्ता खराब होतो. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामासाठी मोठी निधी दिला असून या रस्त्याचा तब्बल 1500 मीटरचा भाग काँक्रीटचा बनविला जात आहे. दरम्यान, मागील दीड महिन्यात या रस्त्यावर तब्बल 500 मीटर लांबीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याने बनवून घेतला आहे.

नेरळ साई मंदिर ते कशेलें मार्गावर साई मंदिर ते कोल्हारे फाटा हा 500मिटर लांबीचा रस्ता बनवून तयार झाला आहे. तर, कोल्हार फाट्या‌पासून जिते फाटा आणि पुढे सुप्रिया हॉटेल हा 500 मिटर लांबीचा रस्ता अंतिम टप्प्यात असून या रस्त्याचा 500 मीटर लांबीचा एक भाग सार्वजनिक बांधकाम खात्याने अवघ्या दीड महिन्यात पूर्ण केला आहे. पावसाळा सुरू होण्याआधी त्या रस्त्यावरील 150-200 मीटर लांबीचा एक भाग देखील पूर्ण करून अखंड रस्ता बांधकाम खात्याकडून खुला होणार आहे. तर, या रस्त्यावर दरवर्षी उल्हास नदीचे पाणी नदीला पूर आल्यानंतर रस्त्यावरून वाहत जाते. त्यामुळे डांबरी रस्ता टिकत नाही. ही बाब लक्षात घेऊन या रस्त्यावर पाटील वडापाव पासून जितेवाडी पूजा रिसोर्ट पुल या भागातील 500 मिटर रस्ता देखील काँक्रिटचा बनविला जात आहे.

या ठिकाणी रस्त्याची एक बाजू एक महिन्यात पूर्ण करण्यात सार्वजनिक बांधकाम खात्याला यश आले आहे. त्यामुळे कशेळ रस्त्यावरील दरवर्षी खड्डेमय होणारा रस्ता यावर्षीपासून काँक्रिट रस्त्यामुळे सुखकर होणार आहे. यामुळे नेरळ-कशेळ रस्त्यावरील पावसाळयात खराब होणारे नेरळ साई मंदिर ते जिते फाटा आणि वाकस गाव या सर्व भागातील रस्ते काँक्रिटचे बनल्याने रस्ते खड्ड्यात जाण्याची वेळ येणार नाही, अशी भावना वाहनचालक व्यक्त करीत आहेत.

Exit mobile version