रेवदंडयातील पोर्तुगिजकालीन आगरकोट किल्ल्याचे भग्नावशेष
| रेवदंडा | प्रतिनिधी |
शिवकालीन असो वा पोतुर्गाल… या दोन राजवटीत बांधलेले इतिहासाचे साक्षीदार आता ढासळू लागलेत. त्यांच्या या ढासळल्याने इतिहासाच्या पाऊलखुणाच मिटत चालल्याचे दिसत आहे. इतिहासाचा हा ठेवा सरकारने जोपासला पाहिजे अशी मागणी पर्यटक, इतिहासप्रेमींकडून होत आहे.
सन इ.स. 1524 मध्ये पोर्तुगिजांनी रेवदंडयाचा आगरकोट किल्ला बांधून पूर्ण केला. व सुमारे 200 वर्षापेक्षा जास्त काळ म्हणजेच मराठयानी इ.स.1740 मध्ये हा प्रदेश ताब्यात घेईपर्यंत तो पोर्तुगिजाच्या ताब्यात होता. या कालावधीत या किल्लात बांधलेल्या अनेक इमारती , बुरूज, तटबंदी चर्च, दरवाजे, तुरूंग, पागा, इत्यार्दीचे अनेक भग्नावशेष आजही पहावयास मिळतात.
रेवदंडा गावाचे दक्षिण टोकास या किल्लाचा दक्षिण दरवाजा आहे. तेथपासून अलिबाग रस्त्यावर किल्ल्याचा तट फोडून तयार केलेल्या मार्गापर्यंत हा किल्ला विस्तारलेला आहे. रेवदंडा अलिबाग रस्त्याच्या थोडे पुढे पश्चिमेला किल्ल्याचा उत्तर दरवाजा आहे. या दोन दरवाज्यामध्ये असणार्या किल्ल्याचे अनेक अवशेष आजही इतिहासाची साक्ष देत तग धरून आहेत.
इ.स.1524 मध्ये किल्ला बांधल्यानंतर सोळाव्या शतकाच्या अखेर पूवर्र् काळात येथे अनेक इमारती बांधल्या गेल्या. सन इ.स.1634 मध्ये बोकारो याने या ठिकाणचे खुलासेवार वर्णन केले आहे. त्यावेळी पोर्तुगिज किल्ल्यात घडीव दगडांच्या भिंती असलेल्या आवाराच्या आत सेनाधिकारी रहात होता. तेथे एक तुरूंगही होता. किल्ल्यात 200 पोर्तुगिज व 50 स्थानिक ख्रिश्चनांची मजला असलेली घरे होती तसेच दोन शस्त्रागरे होती. त्याचप्रमाणे किल्ल्यात भव्य कॅथेड्रक रूग्णालय, सेंट पॉल जेझुईट चर्च, जेझुइट मोनॅसटी, डोमिनिकन फ्रॉन्सिस्कन चर्च, सातखणी बुरूज, यामध्ये सातखणी बुरूज डोमिनिकन फ्रॉन्सिस्कन चर्चचा भाग समजला जातो. व ऑगास्टिनियन चर्च व मॉनेस्टटी अशा सात इमारती होत्या. पोर्तुगिज काळात या भागाचे वैभव खुप मोठे असावे, काळाच्या ओघात या वास्तू नष्ट झाल्या. त्याप्रमाणे भिंतीच्या बाहेर सेंट सॅबेस्टीयन चर्च, सेंट जॉन पॅरिस चर्च व मदर ऑफ गॉड चे कॅपूचिन चर्च अशा तीन इमारती होत्या. त्यापैकी मदर ऑफ गॉडचे मंदिर, रेवदंडा गोळा स्टॉपवरून भोईवाडा येथे जाणार्या रस्त्यावर अस्तित्वात आहे. त्याला मांजरूबाईचे मंदिर असेही म्हटले जाते. मांजरदेस असंही उल्लेख इतिहासात आढळतो.
पोतुर्गिजांची जुनी वखार
दक्षिण दरवाज्याच्या दोन कमानीतून आत गेल्यावर थोडे पुर्वेला चौकोनी बुरूज आहे. येथेच पोर्तुगिजांनी 1516 सालात वखार बांधली. व सभोवती सुरक्षीततेसाठी 1521-1524 या कालावधीत मजबुत भिंती बांधल्या. पोर्तुगिजाची ही गोव्याबाहेरील सर्वात जुनी इमारत आहे. वखारीचा दर्शनीभाग दगडी दरवाजाची एक सुंदर कमान असून ती शाबूत आहे. तिच्या वरच्या बाजूस मध्यभागी पोर्तुगीज बोधचिन्ह असून त्याच्या दोन्ही बाजूस उभ्या मानवाकृती आहेत.
बुरूजाच्या लगत भोवताली सर्व इमारती पुर्णपणे पडलेल्या असून कुठेतरी अर्धवट भिंतीचे अवशेष दिसतात. या सर्व इमारती फ्रांसिस्कन चर्च व मठीच्या सरक्षंणासाठी बांधलेल्या होत्या. सन इ.स. 1577 च्या वेढयात त्यांनी फार मोठी कागगिरी बजावली होती. फ्रान्सिस्कन चर्च सेंट सातबाराच्या नावे 1534 मध्ये सुरू केले होते. सन 1847 पर्यंत हे चर्च सुस्थितीत होते. इ.स 1854 मध्ये त्याची बरीच पडझड झाली. सन. इ.स. 1549 मध्ये बांधलेले डोमनिकल चर्च व मठीचे काही अवशेष आहेत. सध्या त्याची एक दगडी भव्य कमान, पाठभिंत व बाजूच्या भिंती आहेत. खिडक्यांच्या वर पुढे आलेल्या भागावर नक्षीकाम आहे. दक्षिणेकडील बाजूस काही अक्षरे कोरलेली आहेत.
आता अवशेष विखुरलेले
मुख्यः मोठ्या कमानीच्या दोन्ही बाजूस उंच खिडक्या असलेल्या भिंतीचे अवशेष आहेत. समोर डाव्या बाजूस धोडयांच्या पागेची जागा आहे. समोर भव्य इमारतीचे अवशेष विखुरलेले आहेत. हे चर्च 1634 मध्ये सर्वात वैभव संपन्न होते. डोमिनिकन चर्च व मठीच्या पुर्वेस सुमारे 45.72 मीटरवर लहान इमारतीचे काही अवशेष दिसतात. तेथून पुढे काही अंतर गेल्यावर उजव्या बाजूस सेंट झेविंयर चॅपलचे आकर्षण दिसतात. त्याच्या दरवाजावरील एक चौकोनी दगड खाली पडला असून त्यावर लेख आहे. या चर्चच्या दोन्ही बाजूच्या भिंती शिल्लक आहेत. डोमिनिकन चर्च व सेंट झेविंयर चॅपेलवरील संगमवरी शिलालेखावरून त्याचे स्थान निश्चित करता येते.
पोर्तुगिज रेवदंडयाच्या इतिहास पहाता येथे त्यानी सन इ.स.1580 पासून चर्च, शाळा आणि चेझुइट कॉलेजही उभे केले होते. पोर्तुगिजांनी रोमच्या धर्तीवर रेवदंडयास चर्चचे काम सुरू केले होते. सेंट झेव्हियअरने कॉलेज सुरू करण्यात तर डॉ. चेअरी स्टोव्हन यांने फंड जमा करून मर्सी हाऊस सुरू केले होते. येथे सुरू केेलेल्या कॉलेज मध्ये तर्कशास्त्र, खगोलशास्त्र, धर्मतत्वे, शिकविली जात अशी नोंद इतिहासात सापडते.
सन 1739 मध्ये वसई मराठयाच्या ताब्यात गेल्यावर यापुढे आपला टिकाव लागणार नाही हे जाणून पोर्तुगिजानी आगरकोट व कोर्लई हे दोन्ही किल्ले इंग्रजाना दिले. पुढे अॅग्लो-पोर्तुगिजांच्या प्रतिनिधी कॅप्टन इंचबर्ड यांच्या मध्यस्तीने 1740 मध्ये तह होऊन चौलचा प्रदेश मराठयांना मिळाला व पोर्तुगिज गोव्याला गेले.