। अलिबाग । प्रतिनिधी ।
18 महिन्यांचे शासकीय नियुक्ती आदेश मिळण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सन 2017 मध्ये प्रवेश घेतलेल्या व सन 2019-20 मध्ये उत्तीर्ण अधिपरिचारीकांचे उपोषण आंदोलन सोमवारी आठव्या दिवशीही सुरुच आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अहवालानुसार बी.जी.पाटील व इतर चार अधिपरिचारीका यांची तब्येत खालावल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास सांगण्यात आले. परंतु उपोषणार्थिंनी दाखल होण्यास स्पष्ट नकार देत उपोषणावर ठाम राहण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, उपोषण मागे न घेतल्यास आंदोलक अधिपरिचारीका यांची नर्सिंग रजिस्ट्रेशन बंद करण्याची धमकी आरोग्य उपसंचालक ठाणे विभाग यांनी पत्राद्वारे दिली असल्याचा आरोप बी.जी. पाटील यांनी केला आहे.
दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील व अलिबाग तालुका अध्यक्ष महेश कुन्नुमल, लोकशासन आंदोलन व कामगार युनियन या संस्थेचे रायगड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, मेढेखार व कालवडखार शेतकरी संघर्ष समिती, तसेच रायगड जिल्ह्यातील जनतेने या आंदोलनाला उत्स्फुर्त पाठिंबा जाहिर केला आहे. शनिवारी दि. 26 मार्च रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अहवालानुसार बी.जी.पाटील व इतर चार अधिपरिचारीका यांची तब्येत बिघडल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास सांगितले. परंतु उपोषणार्थिंनी दाखल होण्यास आपला स्पष्ट लेखी नकार दिला आहे. त्यामुळे उपोषण मागे न घेतल्यास आंदोलक अधिपरिचारीका यांची नर्सिंग रजिस्ट्रेशन बंद करण्याची धमकी आरोग्य उपसंचालक ठाणे विभाग यांनी पत्राद्वारे दिली असल्याचे बी.जी. पाटील यांनी सांगितले. आम्हाला आमचे 18 महिन्यांचे आदेश मिळाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याचे अधिपरिचारिकांनी सांगितले.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे समाजक्रांती आघाडीचे रायगड जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बी.जी. पाटील यांनी म्हटले आहे की, स्थानिक प्रशासनाबरोबर आमचे भांडण नसून ठाणे उपसंचालक व मुंबईतील इतर वरिष्ठ अधिकारी, आरोग्य सचिव व आरोग्य मंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्याबरोबर आमची चर्चा घडवून आणण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात यावे म्हणजे आंदोलकांचे मत व मागण्या संबंधित अधिकारी व मंत्री यांच्या कानावर आम्हाला घलता येतील आणि असे झाले तरच या प्रकरणातून काहीतरी तोडगा निघू शकेल. त्यामुळे संबंधित कार्यालयांनी सहकार्य करावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी अधिपरिचारीका यांचा पालकवर्ग, संघटनेचे पदाधिकारी, जिल्हा सचिव किशोर पाटील, रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद घेवदे, महिला आघाडी प्रमुख श्रद्धा पाटील, रिना चिंबुलकर व पुष्पा पाटील आदी प्रयत्न करीत आहेत.