आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं विक्रमी पाचवं जेतेपद
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताच्या हॉकी संघाने चीनचा पराभव करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले आहे. भारतीय संघ पाचव्यांदा आशियाई ट्रॉफी पटकावण्यात यशस्वी ठरला आहे.
चौथ्या क्वार्टरमध्ये भारताकडून जुगराज सिंगने एक गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. चीनने अखेरच्या सेकंदापर्यंत गोल करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय खेळाडूंनी कडवी झुंज देत विजय आपल्या नावे केला. चीनने पहिल्यांदाच आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर पाकिस्तानच्या संघाने दक्षिण कोरियाचा पराभव करत तिसरे स्थान मिळवले.
भारतीय हॉकी संघाने लागोपाठ दोन वेळा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. याआधी उपांत्य फेरीत भारतीय हॉकी संघाने कोरियाचा 4-1 असा पराभव केला होता. उपांत्य फेरीत कोरियन संघाविरुद्ध हरमनप्रीत सिंग, उत्तम सिंग आणि जर्मनप्रीत सिंग यांनी गोल केले. कर्णधार हरमनप्रीतने एकूण दोन गोल केले होते. हरमनप्रीत सिंगने संपूर्ण टूर्नामेंटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. यासाठी हरमनप्रीतला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताबही मिळाला. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघातील एकाही खेळाडूला गोल करण्यात अपयश आले. भारताने गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. मात्र, गोल करण्यात संघाला यश आले नाही. भारताला पेनल्टी कॉर्नरही मिळाला. पण त्याचा फायदा भारतीय हॉकी संघाला करता आला नाही. दुसर्या क्वार्टरमध्येही दोन्ही संघांकडून एकही गोल झाला नाही. या क्वार्टरमध्ये चीनच्या बचावफळीने चांगली कामगिरी करत भारतीय खेळाडूंना रोखून धरले. तिसर्या क्वार्टरमध्ये चीनने गोल करण्यासाठी अनेक हल्ले केले. पण त्यापैकी एकही गोल भारतीय गोलरक्षक कृष्णा पाठकपर्यंत पोहोचू शकला नाही.
जुगराज सिंहचा जबरदस्त गोल तिसर्या क्वार्टरपर्यंत दोन्ही संघाकडून एकही गोल झाला नाही. अशा स्थितीत पेनल्टी शूटआऊटपर्यंत सामना जाईल असे चित्र होते. यानंतर जुगराज सिंगने उत्कृष्ट मैदानी गोल करत संघाला सामन्यात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळे भारतीय हॉकी संघाच्या विजयाच्या आशा वाढल्या. यानंतर भारताने चीनला गोल करण्याची एकही संधी दिली नाही. अंतिम फेरीतील जुगराजचा गोल संघासाठी ट्रॉफी जिंकण्यात महत्त्वाचा ठरला. भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे आणि अंतिम फेरीपर्यंत एकही सामना गमावलेला नाही. यंदाच्या टूर्नामेंटमध्ये अपराजित राहिलेल्या भारतीय हॉकी संघाने पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी, भारताने 2011, 2016, 2018 (पाकिस्तानसह संयुक्त विजेते) आणि 2023 मध्ये देखील भारतीय संघाने ट्रॉफी जिंकली होती.