| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात सोमवारपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविली आहे.
उद्यापासून (18 सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती खुळे यांनी दिली आहे. कोकण, विदर्भ वगळता, मराठवाड्यात आठवडाभर तर मध्य महाराष्ट्रात 18 सप्टेंबर पासून पुढील पाच दिवस पावसाचा जोर कमी होणार आहे. शुक्रवार ( 23 सप्टेंबरपर्यंत) पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवत आहे. असे असले तरी, मुंबईसह संपूर्ण कोकणातील चार जिल्ह्यात मात्र जोरदार पडत असलेल्या पावसाचे सातत्य आणि शक्यता अजूनही कायम आहे. कदाचित सप्टेंबर महिन्याअखेरपर्यंत तीव्रता टिकून राहण्याची शक्यता जाणवत आहे. विदर्भात येत्या दोन ते तीन दिवस जरी सध्या काहीशी उघडीप जाणवली तरी सोमवार (19 सप्टेंबरपासून) पुन्हा विखुरलेल्या स्वरुपात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती खुळे यांनी दिली आहे.
राजस्थानमधील वायव्य टोकाच्या भागात परतीच्या पावसाचे वेध लागण्याची शक्यता असली तरी सप्टेंबर महिना अखेरीस ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वार्यांची दिशा बदलून परतीच्या पावसाचे वारे वाहू लागतील असेही ते म्हणाले.
पुढील चार दिवस (19 सप्टेंबरपर्यंत) हिमालयातील बद्री-केदार पर्यटकांना हिमालय चढाईत घातक विजा, गडगडाटसह अति जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानुसार पर्यटकांनी नियोजनात बदल करावा असे खुळे यांनी सांगितले. गेल्या दहा दिवसात मान्सूनचा आस त्याच्या मूळ सरासरीच्या जागेपासून खूपच दक्षिणेकडे सरकल्यामुळं पाऊस पडत आहे. आठवड्यापूर्वी शुक्रवारी (9 सप्टेंबर) बंगालच्या उपसागरात ओरिसा किनारपट्टीसमोर तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे तसेच त्याचे वायव्य दिशेकडे देशाच्या मध्य भू-भागावर झालेल्या मार्गक्रमणामुळं हा जोरदार पाऊस कोसळला आहे.