| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलेला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. या अगोदर श्रीवर्धन नगरपरिषदेने एका खासगी कंपनीला शहरातील कचरा उचलण्याचे, त्याचप्रमाणे गटारे साफ करणे आणि समुद्रकिनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर स्वच्छता करणे इत्यादी कामे नेमून दिली होती. परंतु, या कंपनीच्या निविदेची मुदत संपल्यामुळे कंपनीने काम बंद केले आहे. त्यामुळे श्रीवर्धन शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या नगर परिषदेच्या घंटागाड्यांवरती नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी कचरा नेण्याचे काम करत आहेत. परंतु, कंत्राटी कामगारांचे काम बंद झाल्यामुळे ते देखील बेरोजगार झाले आहेत.
सध्या मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळे श्रीवर्धनला पर्यटक खूप मोठ्या प्रमाणावर येत आहेत. येणारे पर्यटक हे समुद्रकिनारा पाहायला आवर्जून येत असतात व त्या ठिकाणी समुद्र स्नानाचा आनंद देखील घेतात. परंतु, याच समुद्रकिनाऱ्यावरती बांधलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची गेल्या कित्येक दिवसापासून स्वच्छताच होत नसल्याने, या ठिकाणी सर्वत्र अस्वच्छता असल्याचेच दिसून येत आहे. धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर असलेल्या कचराकुंड्या देखील कचऱ्याने भरलेल्याच आहेत. तसेच, बंधाऱ्यावर आलेली वाळू देखील साफ केली नसल्यामुळे बंधाऱ्याला अस्वच्छतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. श्रीवर्धन नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होऊन नवीन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, त्याचप्रमाणे सभापती, नगरसेवक सक्रिय झाले आहेत. परंतु, शहराच्या स्वच्छतेकडे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सुद्धा दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तरी श्रीवर्धन नगरपरिषदेने धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची तातडीने स्वच्छता करून घ्यावी व समुद्रकिनाऱ्याच्या इतर भागात देखील असलेला कचरा तातडीने उचलावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.







