। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील डोंगरात वस्ती करून राहत असलेल्या 14 आदिवासी वाड्या आणि दोन गावे स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरदेखील मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. वन विभाग रस्ते करण्यास परवानगी देत नाही तर शासनदेखील दुर्लक्ष करीत आहे. या सर्व वाड्यांना जाण्यासाठी पक्का रस्ता व्हावा म्हणून आदिवासी संघटना आंदोलन करतात मात्र शासनाच्या यंत्रणा या आदिवासी लोकांच्या विकासासाठी प्रयत्न करीत नसल्याचे चित्र कर्जत तालुक्यात आहे. दरम्यान, सरकारने पैसे मंजूर केलेल्या वाड्यांना रस्ता बनविण्यासाठी सात महिन्यापूर्वी ठेका मिळविणारा ठेकेदार वन जमिनीच्या परवानग्या मिळविण्यासाठी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
कर्जत तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्या या पक्क्या रस्त्यापासून वंचित आहेत.कर्जत तालुक्यात दोन डोंगर रांगेत असलेले आदिवासी पाडे हे रस्त्यापासून वंचित होते.त्यात ढाक परिसरातील वदप ग्रामपंचायतीमधील ढाक आणि कळकराई ही दोन गावे आजही रस्त्यापासून कोसो दूर आहेत. या दोन्ही गावांची रचना लक्षात घेता रस्ता तेथे नेणे आणि पक्क्या रस्त्याने गावे जोडणे कठीण आहेत. त्यामुळे 30 घरांच्या वस्तीचे ढाक गाव आज केवळ सहा घरांचे राहिले आहे. कळकराई येथेदेखील सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांनी गाव सोडले असून अर्धे गाव ओस पडले आहे.
दुर्गम भागातील अंभेरपाडा ग्रामपंचायतीमधील तुंगी या गावामध्ये मागील दोन वर्षात रस्ता पोहचला आहे. मात्र त्या तीव्र चढावाच्या रस्त्याने गावी पोहचणे तसे धोकादायक आहे.तर बेडीसगावामधील वाघिणीचे वाडीमध्ये रस्ता पोहचण्याची शक्यता फार दुर्मिळ आहे. माथेरान डोंगर रांगेत असलेल्या 13 आदिवासी वाड्या आजही रस्त्यापासून दूर आहेत. स्थानिक आदिवासी रस्त्यासाठी दरवर्षी श्रमदान करतात आणि आपली पायवाट स्वतःच बनवतात. त्यात सर्वाधिक 13 आदिवासी वाड्या या नेरळ माथेरान घाट रस्त्यातून सुरू होणार्या डोंगर रांगेतील आहेत. येथील जुम्मापट्टी येथून सुरू होणार्या आदिवासी वाद्यांचा पट्टा हा कर्जत शहराजवळील किरवली ग्रामपंचायत हद्दीत राहणार्या आदिवासी लोकांना देखील पक्का रस्ता मिळाला नाही.
माथेरानच्या डोंगरामध्ये असलेल्या 12 आदिवासी वाड्या या चार ग्रामपंचायतीमधील वाड्या आहेत. त्यात माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायतीमध्ये बेकरेवाडी तसेच जुम्मापट्टी धनगर वाड्यांचा समावेश आहे. तर आसल ग्रामपंचायतीमध्ये आसल वाडी, बोरीचीवाडी, मना धनगर वाडा, धामणदांड, सागाची वाडी, चिंचवाडी, सागाची वाडी, भूतीवली वाडी, पाली धनगर वाडा, नाण्याचा माळ यांचा समावेश आहे. तर उमरोली ग्रामपंचायतीमध्ये आषणे वाडी आणि किरवली ग्रामपंचायत मध्ये सावरगाव वाडी आणि किरवली वाडी यांचा समावेश आहे.उन्हाळयात या भागातील लोक श्रमदान करून पावसाळा वगळता अन्य महिन्यात ये जा करण्यासाठी टाईमपास रस्ता बनवतात.श्रमदान करून बनवलेल्या लाल मातीच्या रस्त्याने पुढे चालल्यानंतर धुरळा खात गावी पोहवण्याचा प्रयत्न हे आदिवासी लोक वर्षानुवर्ष करीत आहेत.त्यात अडथळा ठरत असलेल्या वन जागेचा विषय वनीकरण केले जात असल्याने निकाली निघू शकतो.मात्र शासनाची आणि लोकप्रतिनिधी यांची मानसिकता असण्याची गरज आहे.
नळाचे पाणी..
दुर्गम भागात असलेल्या कोणत्याही आदिवासी वाड्यांना नळपाणी योजना नाहीत. नळाचे पाणी ऐवजी तेथे विहीर खोदून पाणी पुरवण्याचा प्रयत्न आहे.वाघिणीचे वाडीमधील ग्रामस्थ दोन किलोमीटर अंतरावरून खाली पायथ्याशी येतात आणि पाणी भरून हांडे डोक्यावर घेवून जातात.नळ पाणी योजनेचे काम सुरु आहे,मात्र त्याला गती नाही आणि त्यामुळे डोक्यावरील हांडे अद्याप उतरले नाहीत.
समीर खेडेकर.. वन अधिकारी कर्जत पश्चिम
जुम्मा पट्टी ते किरवली या दरम्यानच्या आदिवासी वाड्यांना जोडणारा रस्ता मंजूर झाला आहे. या मार्गावर चार ग्रामपंचायती असून त्या ग्रामपंचायतीमधील प्रत्येकी एक हेक्टर क्षेत्र रस्ता बनविण्यासाठी मान्यता देण्याचे अधिकार जिल्हा उपवन संरक्षक यांच्याकडे आहेत. ग्रामीण विकास यंत्रणा आणि स्थानिक आदिवासी यांनी सर्व कागदपत्र जमा करून आमच्या कार्यालयाकडे दिल्यास 15 दिवसात मंजुरी देण्याचे प्रयत्न होतील. आजच्या तारखेला त्या वन जमिनीचा कोणताही प्रस्ताव आमच्या कार्यालयात दाखल झालेला नाही.