मुरुड तालुक्यातील अनेक लाभार्थी अद्यापही वंचित
| कोर्लई | वार्ताहर |
सर्वसामान्य आणि गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत शंभर रुपयांत आनंदाचा शिधा किट देण्याची घोषणा केली. मात्र, दिवाळीचे दोन दिवस होऊनही हा शिधा लाभार्थ्यांना मिळाला नसल्याने त्यांचा आनंद हवेत विरला आहे. वाढत्या महागाईत सरकारच्या या निर्णयामुळे आपली दिवाळी चांगली होणार या आशेने गोरगरिबांना दिलासा मिळाला.
राज्य सरकारने शंभर रुपयांत आनंदाचा शिक्षा किट यात रवा, साखर, गोडेतेल आणि चणादाळ या वस्तूंचा समावेश आहे. मात्र, दिवाळीच्या सुरुवातीलाच हे किट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असताना दिवाळीचे दोन दिवस नरक चतुदर्शी व लक्ष्मीपूजन होऊनही ते अद्याप अनेक ठिकाणी पोहोचले नसल्याने त्यांच्या दिवाळीचा आनंद शिधाचा आनंद आज तरी हवेत विरला आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोमुळे आनंदाचा शिधा किटला विलंब झाल्याचे समजते.
मुरुड तालुक्यातील 17175 कार्डधारकांना या आनंद शिधा किटचा लाभ मिळणार आहे. तालुक्यातील तळेखार ते नांदगाव भागात हे किट मिळाले असून, उर्वरित गावातील गोरगरीब लाभधारकाचा आनंद या आनंद शिधा किट न मिळाल्याने अद्याप तरी हवेतच विरला आहे.