| उरण | प्रतिनिधी |
रामायणातील पौराणिक काळापासून द्रोणागिरी पर्वत सर्वांनाच माहीत आहे. अनेक आयुर्वेदिक वनस्पती, औषधी संजीवनी याच डोंगराच्या कडेकपारीमध्ये आहेत. या परिसरात डोंगरदेवी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या करंजा ग्रामस्थांचे आराध्यदैवत असलेल्या द्रोणागिरी मातेवर भाविकांची श्रद्धा आहे. मात्र या पौराणिक काळातील द्रोणागिरी पर्वताला पोखरून करंजा-रेवस सागरी सेतूची निर्मिती करण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. त्यामुळे उरणकर, भाविक तसेच गडप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
या विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत ग्रामस्थ असल्याचे समजते. मात्र याबाबत कोणताच लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष व त्यांचे नेतेमंडळी व इतर कोणीच आवाज उठवीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भविष्यात यामुळे ओएनजीसी प्रकल्पालाही धोका पोहचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तुळजापूरची भवानीमाता, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडची रेणुका माता, नाशिक इथल्या वणीची सप्तश्रुंगी (अर्धे शक्तीपीठ) अशी साडेतीन शक्तिपीठे महाराष्ट्रात आहेत. या साडेतीन शक्तीपिठांव्यतिरिक्त आदिमाया शक्तीची अनेक श्रद्धास्थाने महाराष्ट्रात आहेत. अरबी सुमद्राच्या करंजा खाडीकिनारी डोंगरमाथ्यांवरील श्री द्रोणागिरीमातेचे मंदिर अनेक वर्षांपासून प्रसिद्धीपासून दूर राहिले आहे. रामायणातील पौराणिक काळापासून द्रोणागिरी पर्वत सर्वांनाच माहीत आहे. अनेक आयुर्वेदिक वनस्पती, औषधी संजीवनी याच डोंगराच्या कडेकपारीमध्ये आहेत. या परिसरात डोंगरदेवी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या करंजा ग्रामस्थांचे आराध्यदैवत असलेल्या द्रोणागिरी मातेवर भाविकांची श्रद्धा आहे. द्रोणागिरी परिसरात तिसऱ्या नवी मुंबईचा विकास होत असताना भविष्यात येणारे प्रकल्प हे या भागातील ऐतिहासिक व पुरातन वास्तू यांचे जतन करून त्यांना पर्यटन स्थळ म्हणून घोषित करून शासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक असताना उरण तालुक्यातील ऐतिहासिक द्रोणागिरी पर्वत व द्रोणागिरी मंदिर यांना यांना धक्का देत भूमाफियांनी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून द्रोणागिरी पर्वताचीच माती महामार्गासाठी वापरून ऐतिहासिक वारसा नष्ट करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच या भागातील इतर प्रकल्पासाठी मातीचा वापर भराव करण्यासाठी करता येणे शक्य होणार असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) च्या माध्यमातून नव्याने हा मार्ग उभारण्यात येत आहे. प्रस्तावित रेवस ते रेड्डी या मुंबईला थेट कोकणाशी जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी सागरी महामार्गाच्या जोड मार्गिकेला करंजा ग्रामस्थांनी हरकत घेतली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांनी मंजूर केल्याप्रमाणे सदरचे काम करण्याची मागणी लावून धरली होती.
उरणच्या करंजा ते अलिबाग येथील रेवस दरम्यानच्या दोन किलोमीटर लांबीच्या पुलाचे भुमीपूजन 14 ऑक्टोबरला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 2 हजार 478 कोटी रुपयांची निविदा या पुलाच्या उभारणीसाठी मागविण्यात आली आहे. या पुलाची एकूण लांबी ही 10.209 किलोमीटर आहे. मुंबईतील सागरी अटल सेतू मार्गे द्रोणागिरी नोड येथून या पुलावरून कोकणात प्रवास करता येणे शक्य होणार आहे. शासनाने याचा कोणताही विचार न करता सदर सागरी सेतूचे काम काही भूमाफियांना हाताशी धरून सुरू करण्यात आल्याचे समजते. येथील लोकप्रतिनिधी, राजकिय पक्ष, नेतेमंडळी व सामाजिक संघटनाही याबाबत काहीच विरोध करीत नसल्याने त्यांचीही या पौराणिक द्रोणागिरी पर्वताचे अस्तित्व नष्ट झाले तरी काहीच देणेघेणे नसल्याचे दिसत असल्याने त्यांचेही आर्थिकसाटेलोट असल्याची चर्चा सुरू आहे.