प्रदूषणाविरोधात संघर्ष समितीचे तहसीलदारांना निवेदन
| धाटाव | प्रतिनिधी |
रोहा तालुक्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी कुंडलिका नदी सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. बारमाही वाहणारी ही नदी आणि परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले (दादा) यांचे अतूट नाते असल्याने तिची ख्याती देश-विदेशात आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत रोहा शहरातील गटाराचे सांडपाणी आणि कचरा थेट नदीपात्रात सोडला जात असल्याने कुंडलिका नदीचे स्वरूप ‘गटारगंगा’सारखे झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नदी संवर्धनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी आणला गेला; परंतु प्रत्यक्षात नदीची स्थिती सुधारली नाही, अशी टीका स्थानिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘कुंडलिका नदी बचाव संघर्ष समिती’ने पुढाकार घेत तहसीलदार देशमुख यांना निवेदन सादर केले. यावेळी दिलीप वडके, अप्पासाहेब देशमुख, विजय देसाई, सुधीर कुमार यादव, उदय करडे, महेश बामूगडे, सुहास खरीवले, प्रथमेश शिर्के, ॲड. दीपक भगत, यज्ञेश भांड, उद्धव आव्हाड तसेच महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा 1974 नुसार नदी प्रदूषित करणे हा गुन्हा असून, दोषींना पाच वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे सांडपाण्याचे प्रमाण वाढले असले तरी त्यावर प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडले जात असल्याची गंभीर बाब समितीने निदर्शनास आणली आहे. ही बाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या लक्षात आणून देऊनही रोहा नगरपालिकेवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. समितीचे दिलीप वडके यांनी इशारा दिला की, प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास कुंडलिका नदी वाचवण्यासाठी आंदोलन तीव्र करण्यात येईल. रोहा शहरासाठी गेल्या 15 ते 20 वर्षांत मोठ्या प्रमाणात निधी आला असला, तरी योग्य नियोजनाअभावी महत्त्वाचे प्रश्न मागे पडल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित असून, त्यावर ठोस निर्णय घेण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे. विकासाच्या नावाखाली केवळ दिखावा न करता मूलभूत प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कुंडलिका नदी वाचवण्यासाठी जेष्ठ नागरिकही पुढाकार घेत असल्याने त्यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.





