वाशिष्ठी नदीच्या गाळ उपसानंतरच पूररेषा आखणार

उदय सामंत यांचे आश्‍वासन
पूरमुक्त चिपळूणसाठी सुरू असणार्‍या साखळी उपोषणाला दिली भेट

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।

सातत्याने चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. तो लवकरच केला जाईल. पण यापूर्वी नदी पात्र आणि परिसरातील गाळ उपसा करण्यात येईल आणि मगच पूररेषा आखली जाईल, अस आश्‍वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.
जुलै महिन्यात आलेल्या महापुराने संपूर्ण चिपळूण उद्धवस्त झाले. भविष्यात चिपळूणला पुरमुक्त करण्यासाठी वाशिष्ठी नदीचा गाळ काढणे, हा त्यावरील मुख्य पर्याय आहे. यासाठी चिपळूण बचाव समितीने विविध मागण्या शासनाकडे केल्या आहेत.
यामध्ये वाशिष्ठी व तिच्या उपनद्या उगमस्थानापासून मुखापर्यंत गाळ काढणे करीता आवश्यक अध्यादेश काढून आर्थिक नियोजन करणे, चिपळूण व परिसराला उध्वस्त करणारी लाल आणि निळी रेषा रद्द करा, नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्यक्ष गाळ काढण्यास सुरुवात करा या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. मात्र, यास शासन वा प्रशासनाकडून आवश्यक तो प्रतिसाद लाभला नसल्याचे चित्र आहे.
याच पार्श्‍वभूमीवर चिपळूण बचाव समितीने प्रांत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यानिमित्त येथील बाजारपेठ बंद ठेवून व्यापार्‍यांनीही शेकडोंच्या संख्येने सहभाग घेतला आहे. आपल्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा पुन्हा एकदा समितीने दिला आहे.
समितीच्या वतीने गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला मंत्री सामंत यांनी भेट दिली. याप्रसंगी सामंत म्हणाले की, कोकणातील नद्यांच्या गाळप्रश्‍नी पुरेसा निधी उपलब्ध झाला पाहिजे, या मागणीवर सर्वच राजकीय पक्ष सहमत आहेत. चिपळुणात पुराचे पाणी भरणे भविष्यात धोकादायक आहे. तसेच या शहराचे पुनर्वसन करणेही शक्य नाही. त्यासाठी गाळ उपसा करावाच लागणार आहे. गाळ काढण्यासाठी साडेनऊ कोटी निधीची मागणी पुरवणीद्वारे अधिवेशनात केली जाणार आहे, मात्र त्यानंतरचा निधी टप्प्या-टप्प्याने मिळवून गाळ काढण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवली जाईल.
प्राथमिक स्तरावर 160 कोटींचा आराखडा तयार असून, त्याप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेत आहे. केवळ गाळ काढून महापुराचा प्रश्‍न सुटणार नाही. एकूणच उपाययोजनांचा आराखडा तयार करावा लागणार आहे. त्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल,असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
या वेळी आमदार शेखर निकम, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, शहरप्रमुख उमेश सकपाळ, तालुकाप्रमुख संदीप सावंत, युवासेनेचे उमेश खताते, निहार कोवळे, नगरसेवक शशिकांत मोदी, तसेच नगरसेविका व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version