गटशिक्षणाधिकाऱ्यांचा उडवाउडवीचा कारभार

धनगर समाजबांधवांकडून आंदोलनाच इशारा

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील मोरगिरी धनगरवाडीतील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये चार शिक्षक मंजूर आहेत. परंतु, पहिली ते आठवी इयत्तेतील 37 विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकवित असल्याची बातमी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द झाली आहे. पोलादपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे यांनी या बातमीची दखल घेऊन त्यांच्या नेहमीच्याच उडवाउडवीच्या कारभाराची चुणूक दाखवली.

मोरगिरी धनगरवाडी या पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व 37 विद्यार्थ्यांना केवळ एकच शिक्षक शिकवत असून, त्याला आठ इयत्तांना शिकवताना मेटाकुटीस यायला होत आहे, तर एका शिक्षकामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीने रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग, पोलादपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी तसेच पोलादपूर केंद्रप्रमुख यांना पत्रव्यवहार करून याप्रश्नी लक्ष वेधले. यानंतर गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे यांनी कोळेकर नावाच्या शिक्षकास या शाळेत नियुक्त करून स्वत:च्या लवाजम्यामध्ये ठेवल्याची बातमी प्रसिध्द झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी बातमीची दखल घेत असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीस सांगितले. पोलादपूर गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांनी बातमीची दखल घेऊन शिक्षकाची नियुक्ती करण्याची भूमिका स्पष्ट केली.

मात्र, ज्यांच्या हातात निर्णयाचा अधिकार आहे, त्या गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे यांनी तालुक्याच्या ठिकाणी एक महिना मास्टर ट्रेनर म्हणून ट्रेनिंगला काढलेल्या कोळेकर या शिक्षकाला मोरगिरी धनगरवाडीमध्ये ‌‘झलक दिखला जा’ असा आदेश देत फक्त एका दिवसासाठी पाठविले. यापूर्वी येथे रूजू असलेल्या शिक्षकाची महाड तालुक्यातील वाकी येथे बदली झाली होती आणि कोळेकर यांना नियुक्त करूनही ते गटशिक्षणाधिकारी साळुंखे यांच्या दिमतीला राहिले होते.

सद्यःस्थितीत पुन्हा समीर गांधी या एकमेव शिक्षकावर मोरगिरी धनगरवाडी शाळेत 4 शिक्षक मंजूर असूनही विद्यादानाची मदार असल्याचे चित्र कायम राहिले आहे. यामुळे पुन्हा एकाच शिक्षकावर धनगरवाडीतील विद्यादानाची भिस्त राहिल्याचे समजून येताच तालुक्यातील धनगर समाजबांधवाकडून गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या उदासिनतेची दखल घेण्यात आल्याने नजिकच्या काळात गटशिक्षणाधिकारी साळुंखे यांच्याविरूध्द कठोर कारवाईसह मोरगिरी धनगरवाडीतील शाळेमध्ये आता मंजूर असलेले चारही शिक्षक रूजू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेण्याची तयारी चालविली आहे. मोरगिरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोददादा शिंदे यांनीही याप्रश्नी रायगड जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचे लक्ष वेधण्याची तयारी दर्शविली आहे. पोलादपूर पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषदेमध्ये लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर प्रशासक म्हणून कारभार पाहणाऱ्या अधिकाऱ्यांकडून तातडीने निर्णय घेण्याऐवजी विविधप्रकारे नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना पिडण्याचे प्रकार जनतेत संतापाचे कारण ठरत आहेत.

Exit mobile version