रंगीबेरंगी राख्यांनी फुलू लागली बाजारपेठ

महागाईमुळे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी कमी
। पनवेल । वार्ताहर ।

येत्या 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या अतूट नात्याचा सण साजरा होणार आहे. त्यासाठी रंगीबेरंगी राख्या बाजारपेठेत फुलू लागल्या असल्यातरी यंदाच्या महागाईमुळे महागड्या राख्या खरेदीचा कल कमी दिसून येत असल्याने राखी विक्रतेसुद्धा चिंतेत आहेत.

नारळी पौर्णिमा व रक्षाबंधननिमित्त ग्राहक मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये जाऊन रंगीबेरंगी अत्याधुनिक राख्या खरेदी करत असतात. त्यामुळेच रंगीबेरंगी राख्यांची सध्या बाजारात रेलचेल दिसून येत आहे. शंभर रुपये डझनपासून एक हजाराहून अधिक किमतीच्या राख्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, गतवर्षी दहा रुपयांना मिळणारी राखी यंदा पंधरा रुपयांना विकली जात आहे. किमतीत दरवाढ झाल्याने महिला वर्गाकडून नाराजी व्यक्त होत आहे.

दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे अनेकांना रक्षाबंधनास मुकावे लागले होते. लॉकडाऊनमध्ये राख्या बनवण्याचे काम हातातून गेल्यानंतर कारागिरांनी उदरनिर्वाहासाठी दुसर्‍या ठिकाणी काम सुरू केले आहे. त्यामुळे आता राख्या बनवण्यासाठी कारागिरही उपलब्ध होत नसल्यामुळे जादा पैसे देऊन कारागिरी करून घ्यावी लागते. त्यातच आता कच्च्या मालाच्याही देखील किमतींमध्ये वाढ झाली असून, वाहतुकीचाही खर्च वाढला आहे. त्यामुळे राखीच्या दरात वाढ झाली असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत; परंतु राख्या खरेदी करण्यासाठी महिला वर्गाची गर्दीसुद्धा कमी प्रमाणात दिसून येत आहे. अनेक जण पारंपरिक राख्या खरेदीवर भर देत आहेत, तर काही जण ऑनलाईन राख्या खरेदी करणे पसंत करत आहेत. शेवटच्या दोन ते तीन दिवसांत राख्यांची विक्री वाढेल, असा विश्‍वास राखी विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.

Exit mobile version