महाराष्ट्राला अजून आठवडाभर प्रतीक्षा!
| मुंबई | प्रतिनिधी |
नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊन चार दिवस उलटले असले, तरी त्याची पुढील वाटचाल मंदावल्याचे चित्र आहे. 7 जून रोजी कोकणात दाखल झालेला मान्सून त्यानंतर अपेक्षित वेगाने पुढे सरकलेला नसल्याने राज्यातील अनेक भागांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, संथ गतीने पुढे सरकत असलेल्या मान्सूनला संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी आणखी किमान आठवडाभराचा कालावधी लागू शकतो.
हवामान विभागाने दिलेल्या विस्तारित अंदाजानुसार 11 ते 18 जून या कालावधीत राज्यातील विशेषतः अंतर्गत भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासह अनेक भागांमध्ये 15 जूनपर्यंत पावसामध्ये विशेष वाढ होण्याची चिन्हे नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या कालावधीत राज्यातील काही भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात. मात्र व्यापक आणि समाधानकारक पावसासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. दरम्यान, मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पुढील किमान आठवडाभर कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी कायम राहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात मान्सून सक्रिय असला, तरी राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये त्याचा प्रभाव तुलनेने कमी राहणार असल्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 18 जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात राज्यातील पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत हा पावसाचा जोर कायम राहू शकतो, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मान्सूनच्या संथ वाटचालीमुळे पावसाचे स्वरूप अद्याप स्थिर झालेले नाही. त्यामुळे पुरेसा ओलावा निर्माण होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी टाळावी. 15 जूननंतरच्या हवामान अंदाजाचा विचार करूनच खरीप हंगामाचे नियोजन करणे अधिक सुरक्षित ठरेल, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
