। कोलाड । वार्ताहर ।
गेली चार पाच दिवसापासून वणव्यामुळे रोहा तालुक्यातील प्रचंड वनसंपदा लोप पावत आहे. खांबचा डोंगरही वणव्यात होरपळत आहे. यामुळे पर्यावरण प्रेमी नागरिकांचा जीव तुटत आहे. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या वनखात्याला मात्र याचे काहीही वाटत नसल्याचे चित्र आहे.
दरवर्षी मार्च महिना उजाडला कि वणवे लावण्याचे प्रमाण मोठे प्रमाणात दिसून येत आहे.वणवे लावण्यावर कुणाचाही अंकुश नसल्याने व त्यांच्यावर कोणतेही कायद्याने कार्यवाही होत नसल्याने वणवे लावणार्यांचे फावत आहे. शिकार करणे, वृक्षतोड करणे, वनसंपदा मिळवणे, तसेच सरपणासाठी लाकूड फाटा यासाठी वणवे लावले जात असले तरी ते कायद्याच्या चौकटी बाहेरचे आहे.परंतु वनखाते पूर्णपणे निद्रावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. या वणव्यामुळे चार दिवसापूर्वी इंदरदेव धनगरवाडी येथे वणव्यामुळे 48 घरांची राखरांगोळी झाली आणि सर्व संसार उघड्यावर पडले. या वणव्यामुळे जंगलातील वन्य प्राणी रानडुकरे, वानर आपला जीव वाचविण्यासाठी गावाकडे येऊ लागली व भातशेतीची नुकसान करू लागली आहेत.
रोहा तालुक्यातील विपुल वनसंपदा लाभलेला मोजक्याच जंगलामध्ये खांबच्या जंगलाचा समावेश होत आहे. तर हा डोंगर मुंबई-गोवा हायवे लगत असलेल्या विपुल वनसंपदेमुळे येणार्या जाणार्यांचे सहज लक्ष वेधून घेत आहे. यामुळे वनसंपदेबरोबरच प्राण्यांच्या वास्तव्यावर देखील गदा येताना दिसत आहे. वणव्याला वेळीच आळा घालण्याची उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.