ऊर्जा कंपनीच्या टॉवर निर्मितीला विरोध
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
मुंबई ऊर्जा लिमिटेड कंपनी टॉवर उभारण्या साठी बळजबरी करत असल्याचा आरोप करत तालुक्यातील चिंध्रण ग्रामस्थांनी सोमवार (दि. 28 ) पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. या वेळी ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. मौजे चिंध्रण येथे गावठाण विस्तार ही प्रकीयाच अद्याप झालेली नाही. त्या मुळे गावठाणाबाहेर सातबारामध्ये गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या संखेत कित्येक पटीने वाढ झाली आहे. तसेच नव्याने अनेकवर्ष जिल्हाधिकारी अलिबाग यांच्याकडे सदर गावठाणविस्तारसंदर्भात पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे, मात्र शासनाकडून ग्रामस्थांची फक्त दिशाभूल केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
चिंध्रण गावामध्ये 2 वेळा ग्रामसभेचा ठराव करून ग्राम पंचायत आणि ग्रामस्थांचा पत्रव्यवहार करूनसुद्धा सदर प्रकिया लालफितीमध्ये अडकून पडली असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. यावेळी ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसून शासनाकडे गरजेपोटी गावठाणाबाहेरील सर्व घरे नियमित करून घेण्याची प्रमुख मागणी केली आहे, तसेच मुंबई उर्जा मार्ग लिमिटेड यांच्या उच्च विदयुत दाबाच्या टॉवर आणि वाहीनी संदर्भातील न्यायाची मागणी केली आहे. या उपोषणात चिंध्रण गावातील किरण कुंडलिक कडू, सुजित नामदेव पाटील, मनोज शिवराम कुंभारकर, राम गोविंद पाटील, विलास महादेव पाटील, मधुकर महादेव पाटील, शैलेश तानाजी अरीवले, जयराम धोंडू कडू, रुपेश शंकर मुंबईकर, बामा धाऊ भंडारी, गणेश अनंता देशेकर, संतोष चंद्रकांत अरीवले, ताईबाई रघुनाथ कडू, समीर पांडुरंग पारधी आदींसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
लेखी परवानगीविनाच काम
साधारणतः 2022 पासून वर्षभर सरू असलेल्या उच्च विद्युत दाबाच्या टॉवरचे काम सुरू होऊन 2023 चा ऑगस्ट महिना येऊन ठेपला आहे. आजपर्यंत कंपनीने ग्रामपंचायत किंवा बाधीत शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची लेखी परवानगी घेतली नाही आणि बळजबरीने पोलीस प्रशासनाच्या दडपशाहीने टॉवर मार्गीकेचे काम सुरू करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी या कंपनीसह प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.