ग्रामपंचायतीकडून कारवाई नाही
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायतीमधील आसलपाडा गावातील अंतर्गत रस्त्यावर स्थानिक रहिवाशाांनी अतिक्रमण करून घरांची अतिरिक्त बांधकामे केली आहेत. त्याअतिरिक्त बांधकामांमुळे स्थानिक राहिवाशी आणि पाहुणे म्हणून आलेल्या लोकांची वाहने ये-जा करू शकत नाहीत. त्याबद्दल काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे अनेक अर्ज केले आहेत, मात्र ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही कार्यवाही करताना दिसत नाही.
तालुक्यातील आसलपाडा या गावातील दोन घरमालकांनी गावातील अंतर्गत रस्त्यावर आपल्या घराच्या पडवीचे बांधकाम केले आहे. त्यासाठी एका ठिकाणी एका ग्रामस्थाने पत्राची शेड आणि दुसऱ्या रहिवाशाने भिंत रस्त्यात बांधली आहे. त्याचा परिणाम गावातील अनेकांचा चारचाकी वाहने नेण्याचा रस्ता बंद झाला आहे. यापूर्वी त्या रस्त्यातून चारचाकी वाहने ये-जा करीत होती. परंतु, भिंत आणि पत्रेची शेड बांधल्याने हा रस्ता आता केवळ पायवाट बनला आहे. त्यात गावातील रहिवाशांची वाहने तसेच गावात आलेल्या पाहुण्यांची वाहनेदेखील गावाबाहेर उभी करावी लागत आहेत.
आसलपाडा गावातील ग्रामस्थांची ही अडचण दूर व्हावी यासाठी गावातील हेमंत शेंडे, मोहन ठोंबरे, दिलीप शेंडे, लीना सोनवणे, सुरेश सोनवणे, लोचन शेंडे, राहुल शेंडे यांनी आसल ग्रामपंचायतीकडे पत्र देत रस्ता वाहतुकीस मोकळा करावा, अशी मागणी केली आहे.