प्रशासन जातीय भेद करीत असल्याचा आरोप
महाड, प्रतिनिधी
तालुक्यातील किंंजळोली खुर्द ग्रामपंचायतीच्या मतदारसंघातून सरपंचपदाची निवडणूक लढविणाऱ्या सुषमा साळवी यांचे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आले असून, केवळ आपण दलित समाजातील असल्याने प्रशासन जातीय भेद करीत असल्याचा आरोप श्रीमती साळवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. आपले नाव त्वरित मतदार यादीत दाखल करण्यात यावे अन्यथा आपण महाड तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
महाड शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला महाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष निलेश महाडिक, राकेश शहा, राजेश जाधव, त्याचबरोबर कींजळोली बौद्ध वाडीचे अध्यक्ष बाळाराम साळवी, सुनील साळवी, विलास बांदवडकर, सुनील कदम, अंकुश साळवी आदी प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते. महाड तालुक्यातील किंजळोली खुर्द येथे राहात असलेल्या सुषमा साळवी यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याने आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावे याकरिता त्यांनी महाड येथील तहसील कार्यालय निवडणूक अधिकाऱ्यांकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून डिसेंबर 2022 मध्ये अर्ज दाखल केला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्याला मतदार ओळखपत्रदेखील देण्यात आले. त्यानंतर ऑनलाईन आलेल्या मतदार यादी पाहिली असता त्यामध्ये आपले नाव नसलेले आढळून आले. तेव्हा अधिकाऱ्यांनी आपले नाव पुरवणी यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले असल्याची माहिती दिली.
प्रशासन आपल्याविषयी जातीय भेद कशाप्रकारे करीत असल्याचे सांगताना श्रीमती साळवी म्हणाल्या, 10 ऑगस्ट रोजी आपण पुरवणी यादी तपासणी असता त्यामध्येदेखील आपले नाव नसल्याचे आढळून आले व पुन्हा चौकशी केली असता येथील अधिकाऱ्याने तुमचे नाव नांदगाव बुद्रुक मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले असल्याची माहिती दिली. आपण किंजळोलो बुद्रुक गावची रहिवासी असताना आपले नाव नांदगाव बुद्रुक मतदार यादी मध्ये समाविष्ट करण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला असता आपण सरपंचपदाचे उमेदवार असल्याने व आपण दलित समाजातील असल्यामुळे केवळ प्रशासन जातीय भेद करीत असल्याचा आरोप श्रीमती साळवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीरपणे केला.
आपले नाव किंजळोली बुद्रुक येथील मतदार यादीमध्ये त्वरित समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी आपण करीत आहोत. येत्या आठ दिवसांच्या आत आपले नाव मतदार यादी समाविष्ट न केल्यास आपण महाड तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा श्रीमती साळवी यांनी दिला.