| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी सात मजली भव्य इमारत बांधली जाणार आहे. या इमारतीमधून रायगड जिल्ह्याच्या विकासाची सुत्रे हलवली जाणार असल्याने सदरची इमारत सर्व आधुनिक सुविधांयुक्त करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी 87 कोटी रुपयांचा सुधारित आराखडा जिल्हा परिषद प्रशासानाने सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
39 वर्षांपासून जिल्ह्याच्या जडणघडणीचे केंद्रबिंदू असलेली ‘शिवतीर्थ’ ही इमारत क्वचितच कधी बंद राहिली असेल; मात्र अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्याने 1 ऑगस्टपासून सुरक्षेच्या कारणास्तव ती कायमची बंद ठेवण्यात आली असून या जागेवर आता नवीन इमारत बांधली जाणार आहे. सुधारित आराखड्यात मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच जुन्या इमारतींचे पाडकाम सुरू होईल. त्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी अपेक्षीत आहे, अशी माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांनी दिली. तळ मजल्यावर पूर्णपणे पार्किंगची व्यवस्था असून त्यावर सात मजले असतील. जिल्हा परिषदेचे बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत ही सर्व कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. साधारण 550 कर्मचाऱ्यांच्या कामासाठी प्रशस्त जागा निर्माण केली जात असून अभियंत्यांसाठी स्वतंत्र कक्षाचे नियोजन आहे. इमारतीमध्ये पदाधिकारी, अधिकारी यांच्या दालनांची अंतर्गत सजावट आधुनिक शैलीत असली तरी जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही ते म्हणाले.
87 कोटींच्या आराखड्यात फर्निचरचा समावेश आहे. कागदपत्रांचे गठ्ठे ठेवण्यासाठी भिंतीमध्येच कपाटे करण्यात येणार आहेत. अंतर्गत सजावटीवर वारंवार खर्च होऊ नये, यासाठी बांधकाम करतानाच इमारतीची वेगळी रचना करण्यात येणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. नवीन इमारतीसाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने 103 कोटी रुपयांचा आराखडा मंजुरीसाठी पाठवला होता. त्यात सुधारणा होऊन 87 कोटींचा सुधारित आराखडा मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आल्याने तातडीने रिकामी करण्यात आली. येथील सर्वच विभागांना एकाच वेळी स्थलांतरित करणे शक्य नव्हते. टप्प्याटप्प्याने बहुतांश कार्यालये कुंटेबाग येथे हलवण्यात आली आहेत. आता जिल्हा परिषदेचा सर्व कारभार कुंटेबागेतूनच सुरू आहे.
कुंटे बागेत पूर्वी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे बंगले, अधिकाऱ्यांची कॉलनी होती. या सर्व इमारतींमध्ये आता विविध विभागांची कार्यालये थाटण्यात आली आहेत. काही कार्यालये इतर ठिकाणी आहेत. प्रशासकीय कारभाराच्या दृष्टीने ही सर्व कार्यालये एकाच इमारतीमध्ये असणे आवश्यक आहे. यासाठी लवकरात लवकर नव्या इमारतीचे काम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बांधकामावर जिल्हा परिषदेचेच नियंत्रण असेल, त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या ऐतिहासिक महत्त्वाला साजेशी अशीच इमारत उभारली जाणार आहे.
भरत बास्टेबाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद