कृषिवलच्या दणक्याने बांधकाम विभागाला जाग

स्मशानभूमीच्या विकास निधीला मुदतवाढ

| चणेरा | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील तळाघर ग्रामपंचायत हद्दीतील बोरघर गावाची स्मशानभूमीची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात अंत्यविधी करताना ग्रामसस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत ‌‘कृषीवल’ने आवाज उठवत ‌‘स्मशानभूमीची दुरवस्था’ अशा मथळ्याची बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने घेतली असून, स्मशानभूमीच्या विकासासाठी मंजूर झालेल्या निधीचा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बोरघर गावाच्या स्मशानभूमीची शेड जीर्ण अवस्थेत असून, अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना मुसळधार पावसात झाडा झुडपांचा आसरा घ्यावा लागतो. तसेच, मृतदेह ठेवण्यासाठी जे लोखंडी पोल उभे केले होते, ते सुद्धा गंजून नष्ट झाले आहेत. परिणामी नागरिकांना त्या ठिकाणी लाकडी डांबे उभे करून उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. कृषीवल प्रतिनिधींनी बोरघर ग्रामसेविका अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामपंचायतीकडे पुरेसा निधी नसल्याचे सांगितले होते. याची दखल कृषीवलने घेतली होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून स्मशानभूमीच्या विकासकामासंबंधी निधी वेळेत वापरण्यात न आल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती. त्यासंदर्भात स्पष्टीकरण देताना रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे उपअभियंता जांभळे यांनी सांगितले की, या विकास निधीवर कोणताही धोका नाही. कामासाठी आवश्यक मुदत डिसेंबर 2025पर्यंत वाढविण्यात आली आहे. संबंधित कामकाज नियोजनानुसार पूर्ण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य संजय भगत यांनीही ग्रामस्थांना आश्वस्त करताना सांगितले की, स्मशानभूमीच्या विकासासाठी मंजूर निधी वाया जाणार नाही. लवकरच काम सुरू होईल. प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून, लवकरच प्रत्यक्ष काम सुरु होईल. लवकरात लवकर आमदार महोदय यांच्या विकास निधीतून विकास काम केलेले असेल, त्यांनी सांगितले आहे. तर, ग्रामसेविका अर्चना पाटील यांनी सांगितले की, बोरघर येथे स्मशानभूमी शेडसाठी मूलभूत सुविधा म्हणून काम केले जाईल.‌ ‘कृषीवल’ने उठविलेल्या आवाजामुळेच जिल्हा परिषदेसह ग्रामपंचायतीला जाग आल्याची चर्चा बोरघर ग्रामस्थांमधून होत आहे. त्यामुळे कृषीवलचे आभार मानत संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर स्मशानभूमीचे काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version